Delhi Assembly – दिल्ली विधानसभेच्या परिसरात एका अज्ञात कारने अचानक व्हीआयपी गेट तोडून आत प्रवेश केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालकासह तीन जणांना ताब्यात घेतले असून उत्तर दिल्लीतून वाहन जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दिल्ली विधानसभा परिसरातील मुख्य गेटवर अचानक एक अज्ञात कार घुसली. यावेळी या कारने मुख्य गेटला जोराची धडक दिली आणि गेट तोडून आत विधानसभेच्या परिसरात प्रवेश केला. चालक थेट विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाकडे गेला, पोर्चजवळ फुलांचा गुच्छ ठेवला आणि कार घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकारामुळे कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांची पथके आणि बॉम्ब निकामी करणारे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या पथकांनी परिसरात कोणताही धोका नसल्याची खात्री करण्यासाठी संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. तसेच परिसरातील आणि आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत शोध मोहिम सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी चालकासह तीन जणांना ताब्यात घेतले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनेचा थरार ! “विधानसभेच्या आवारात गेट क्रमांक २ जवळ एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. सुरुवातीला आम्हाला वाटले की, कारचा टायर फुटला आहे. परंतु, तेव्हा कारने गेट तोडून आत प्रवेश केल्याने आम्ही सतर्क झालो. त्या गाडीचा वेग इतका होता की कोणालाही जवळ जायची हिंमत झाली नाही. ही कार जवळपास पाच मिनिटे विधानसभेच्या आवारात फिरत होती. नंतर ती तिथून निघून गेली”, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पोलीस तपास सुरू ! प्राथमिक माहितीनुसार, कारवर उत्तर प्रदेशातील नोंदणी क्रमांक आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेतले असून कारचा नेमका मार्ग शोधला जात आहे. २४ तास तैनात असलेली सुरक्षा आणि बॅरियर्स असताना एका अज्ञात कारने विधानसभेत प्रवेश केल्यानंतर पळून जाण्यात यश कसे मिळवले? याबाबत आता वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे अद्याप गाडी आणि त्यातील व्यक्तीचा पत्ता लागलेला नाही. दिल्ली पोलिसांनी शहरभर नाकाबंदी केली असून लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.