‘आप’ एमसीडी महापौरपदाची निवडणूक लढवणार नाही’ ; आतिशी यांनी घोषणा करत भाजपवर केले गंभीर आरोप

Delhi MCD Mayor Election। दिल्ली महानगरपालिका निवडणुकीबाबत माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पार्टी महापौरपदाची निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ही घोषणा करताना आतिश यांनी, “भाजप ज्याठिकाणी निवडणुका हरते त्याठिकाणी लाचखोरी, जबरदस्ती आणि फसवणूक अशा सर्व मार्गांचा अवलंब करते. भाजप इतर पक्षांना फोडून सरकार स्थापन करते.” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना त्यांनी,”एमसीडीच्या पुनर्एकीकरणानंतर, वॉर्डांची संख्या २७२ वरून २५० पर्यंत कमी करण्यात आली, निवडणुका लांबणीवर पडल्या, एमसीडीची सीमांकन करण्यात आले. गुजरात निवडणुकीसोबत एमसीडीच्या निवडणुकाही झाल्या. तरीही एमसीडीमध्ये ‘आप’ला बहुमत मिळाले.” असा दावा केला. आतिशी पुढे म्हणाल्या, “त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना यश आले नाही. गेल्या अडीच वर्षांपासून भाजप आम आदमी नगरसेवकांवर दबाव आणत आहे आणि त्यांना भाजपमध्ये घेऊन जात आहे. आम्ही दिल्लीच्या जनतेचा आदर करतो, आम्ही कोणत्याही आमदार किंवा नगरसेवकाला खरेदी करत नाही किंवा तोडत नाही. आम आदमी पक्ष महापौरपदाची निवडणूक लढवणार नाही.”
पुढे बोलताना त्यांनी, “भाजपने नगरसेवकांना खरेदी करून आणि तोडून आपली संख्या वाढवली आहे, परंतु आम्ही हे सर्व केलेले नाही आणि आम्ही ते करतही नाही, म्हणूनच आम आदमी पक्षाने महापौर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला दिल्लीच्या लोकांसाठी काय करू शकते ते दाखवू द्या.”असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले.
दिल्लीत ट्रिपल इंजिन सरकार तर एक इंजिन एलजीचे Delhi MCD Mayor Election।
दरम्यान, आपचे प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी देखील, “दिल्लीत भाजप सत्तेसाठी हताश आहे. जेव्हा एमसीडी निवडणुका होणार होत्या तेव्हा मर्यादा रद्द करण्यात आली होती. तरीही, आम आदमी पक्षाला १३४ जागा मिळाल्या आणि भाजपला १०४ जागा मिळाल्या.” ते म्हणाले की, भाजपने स्वतःचे सरकार स्थापन करावे. दिल्लीत ट्रिपल इंजिन सरकार आहे, एक इंजिन एलजीचे आहे.” असे म्हणत सरकारवर निशाण साधला. तसेच “भाजपकडे आता कोणतेही सबब नाही, ट्रिपल इंजिन सरकार त्यांना दिल्लीतील लोकांसाठी काम करण्याची पूर्ण संधी देईल” असे सौरभ भारद्वाज म्हणाले.
‘आप’च्या निर्णयावर भाजपने प्रत्युत्तर दिले Delhi MCD Mayor Election।
भाजपनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर म्हणाले, “आम आदमी पक्षाला माहिती आहे की त्यांनी दिल्ली महानगरपालिकेत केवळ बहुमत गमावले नाही तर गेल्या अडीच वर्षांत महानगरपालिकेचे प्रशासकीय आणि देखभालीचे कामही थांबवले आहे. म्हणून आता आम आदमी पक्ष राजीनामा देण्याचे नाटक करत आहे आणि येथून पुढे आप आणि काँग्रेस युती होण्याची शक्यता आहे.”





