Uma Kashvee WPL : २०११ चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर जन्मलेली मुलगी खेळणार WPL! दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक; मोडला सर्वात तरुण खेळाडूचा विक्रम
Uma Kashvee WPL : उमा काश्वीचा जन्म भारताने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या सात दिवसांनी, म्हणजेच ९ एप्रिल २०११ रोजी झाला आहे.

Uma Kashvee Becomes Youngest Player in WPL History Signed by Delhi Capitals : महिला प्रीमियर लीग २०२७ (WPL 2027) च्या मिनी लिलावात भारतीय क्रिकेटमधील एका नव्या प्रतिभावान चेहऱ्याने इतिहास रचला आहे. कोच्ची येथे पार पडलेल्या या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने अखेरच्या क्षणी बोली लावत कर्नाटकच्या १५ वर्षीय अष्टपैलू उमा काश्वी हिला १० लाख रुपयांच्या मूळ किमतीत (Base Price) आपल्या ताफ्यात दाखल केले. या करारासह उमा काश्वी महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. तिच्या या अनपेक्षित निवडीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.
२०११ च्या विश्वचषकानंतर जन्म; दीया यादवचा मोडला विक्रम
उमा काश्वीचा जन्म भारताने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या सात दिवसांनी, म्हणजेच ९ एप्रिल २०११ रोजी झाला आहे. तिने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी डब्ल्यूपीएल करार मिळवत हरियाणाच्या दीया यादवचा विक्रम मोडीत काढला. योगायोग म्हणजे दीया यादवलाही गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सनेच वयाच्या १६ व्या वर्षी संघात घेतले होते. आता काश्वीने दीयाला मागे टाकत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी वयाची खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे.
भारतीय अंडर-१९ संघातून चमकली कर्नाटकची लेक –
Youngest player in the WPL history and ready to make some headlines 🥵
Uma Kashvi, Dilli mein aapka swagat hai 💙❤️ https://t.co/aITT4i4tZY
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 28, 2026
मूळची कर्नाटकची असलेली उमा काश्वी उजव्या हाताची फिरकीपटू असून उपयुक्त फलंदाजीसाठी ओळखली जाते. तिने नुकतीच भारताच्या १९ वर्षांखालील महिला संघाकडून श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळली होती. या दौऱ्यातील तीन टी-२० सामन्यांत तिने ४ विकेट्स घेतल्या, तर दोन एकदिवसीय सामन्यांत २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तिच्या या अष्टपैलू क्षमतेमुळेच दिल्लीने तिच्यावर विश्वास दाखवला आहे.
वैभव सूर्यवंशीप्रमाणे टीम इंडियापर्यंत मजल मारणार का?
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीवर १.१० कोटींची बोली लावली होती आणि त्याने १५ व्या वर्षी थेट भारतीय संघात धडक मारली. आता वैभवप्रमाणेच ही १५ वर्षीय फिरकीपटू महिला प्रीमियर लीगच्या मंचावरून थेट वरिष्ठ भारतीय संघात मजल मारणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.





