Vaishnavi Sharma Record : पहिल्याच चेंडूवर विकेट अन् १० षटकांत ५ विकेट्स! वडोदऱ्यात वैष्णवी शर्माचे वादळ; झूलन गोस्वामीचा मोडला विक्रम
Vaishnavi Sharma Record : भारतीय संघाची युवा फिरकीपटू वैष्णवी शर्मा हिने आपल्या भेदक माऱ्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली आहे.

Vaishnavi Sharma Record Takes Five Wickets in 3rd ODI vs Zimbabwe Vadodara : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा फिरकीपटू वैष्णवी शर्मा हिने आपल्या भेदक माऱ्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली आहे. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या या लढतीत वैष्णवीने अत्यंत नियंत्रित मारा करत १० षटकांत केवळ ३९ धावा देत ५ महत्त्वाचे बळी मिळवले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI) एकाच डावात ५ विकेट्स घेणारी ती भारताची दुसरी सर्वात तरुण गोलंदाज ठरली आहे.
पहिल्याच चेंडूवर बळी; झिम्बाब्वेचा कणा मोडला –
झिम्बाब्वेविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करताना वैष्णवीने डावाच्या सुरुवातीपासूनच फलंदाजांवर जबरदस्त दबाव निर्माण केला. तिने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर ‘बिलव्हड बिझा’ला तंबूत धाडून विकेट्सचे खाते उघडले. त्यानंतर चौथ्या षटकात मोडेस्टर मुपाचिकवा, सातव्या षटकात चिदझा धुरुरु, आठव्या षटकात मिशेल मावुंगा आणि दहाव्या षटकात न्याशा ग्वांजुरा यांना बाद करत तिने झिम्बाब्वेच्या फलंदाजीचा कणाच मोडून काढला.
महिला वनडेत ५ विकेट्स घेणाऱ्या सर्वात तरुण भारतीय गोलंदाज:
Innings Break!
A disciplined bowling effort from #TeamIndia 👌
Over to our batters to chase it down ⏳
Scorecard ▶️ https://t.co/j7kcglDDH0
#INDvZIM | @mflone_ https://t.co/DTi3r6i9PE
— BCCI Women (@BCCIWomen) October 28, 2026
- दीप्ती शर्मा : ६/२० (वय: १८ वर्षे, १७९ दिवस) वि. श्रीलंका, २०१६
- वैष्णवी शर्मा : ५/३९ (वय: २० वर्षे, ३१४ दिवस) वि. झिम्बाब्वे, २०२६
- क्रांती गौड : ६/५२ (वय: २१ वर्षे, ३४५ दिवस) वि. इंग्लंड, २०२५
- नूशिन अल खदीर : ५/१४ (वय: २१ वर्षे, ३४८ दिवस) वि. इंग्लंड, २००३
- झूलन गोस्वामी : ५/१६ (वय: २३ वर्षे, १२ दिवस) वि. इंग्लंड, २००५
दीप्ती शर्माचा राष्ट्रीय विक्रम आजही अबाधित –
या विक्रमी कामगिरीनंतरही भारतासाठी सर्वात तरुण वयात ५ विकेट्स घेण्यायाचा राष्ट्रीय विक्रम अष्टपैलू दीप्ती शर्मा हिच्या नावावर कायम आहे. दीप्तीने १९ फेब्रुवारी २०१६ रोजी रांची येथे श्रीलंकेविरुद्ध अवघ्या १८ वर्षे १७९ दिवस वय असताना ९.२ षटकांत २० धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. वैष्णवीने २० वर्षे ३१४ दिवस वय असताना हा पल्ला गाठत क्रांती गौड, नूशिन अल खदीर आणि महान वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी यांना मागे टाकले आहे.
पाकिस्तानच्या साजिदा शाहचा जागतिक विक्रम –
The feeling of registering your maiden ODI five-wicket haul in #TeamIndia colours 🙇♂️
Updates ▶️ https://t.co/j7kcglDDH0
#INDvZIM | @mflone_ https://t.co/vkmJ75x3va
— BCCI Women (@BCCIWomen) October 28, 2026
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पाच विकेट्स घेण्याचा जागतिक विक्रम पाकिस्तानच्या साजिदा शाह हिच्या नावावर नोंदवला गेला आहे. साजिदाने २१ जुलै २००३ रोजी वयाच्या अवघ्या १५ वर्षे १६८ व्या दिवशी जपानविरुद्ध अवघ्या ४ धावांत ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. दरम्यान, वैष्णवीच्या या भेदक माऱ्यामुळे भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजवता आले असून भविष्यातील भारताची आघाडीची गोलंदाज म्हणून तिने आपली छाप सोडली आहे.





