Ukraine : युक्रेनकडून रशियाच्या अणू उर्जा प्रकल्पावर मारा
Ukraine | Russia – युक्रेनने आपल्या अणू उर्जा प्रकल्पावर ड्रोनचा मारा केल्याचा आरोप रशियाने केला आहे. युक्रेनच्या या हल्ल्यामुळे या प्रकल्पाला आग लागली. पश्चिमेकडील कुर्स्क प्रांतातल्या या प्रकल्पावर रात्रीच्यावेळी युक्रेनच्या ड्रोनचा मारा झाला होता.
युक्रेनने रात्रभरात इतक काही उर्जा प्रकल्प आणि वीज केंद्रांवरही असेच हल्ले केले असल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याच दरम्यान युक्रेनने आपला ३४ वा स्वातंत्र्यदिन देखील साजरा केला.
कुर्स्क येथील अणू उर्जा प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर तेथे लागलेली आग त्वरित विझवण्यात आली. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्रड्रोन हल्ल्यामुळे प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले. या प्रकल्पातून व्हायला लागलेल्या किरणोत्सर्गाचे प्रमाण सामान्य प्रमाणात मर्यादित आहे, असे प्रकल्पाच्या माध्यम सेवा विभागाने टेलिग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘रान्सफॉर्मरला लष्करी हल्ल्यामुळे आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे. पण तटस्थ संस्थेमार्फत या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नसल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अणू उर्जा निरीक्षक संस्थेने म्हटले आहे.
उर्जा सुविधा केंद्र कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित राखले गेले पाहिजे, असे या निरीक्षक संस्थेचे महासंचालक मारियानो ग्रोसी यांनी म्हटले आहे. रशियाच्या अणू उर्जा प्रकल्पावरच्या या कथित हल्ल्यावर युक्रेनकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.
रशियाच्या लेनिनग्राड भागातील उस्त-लुगा बंदरामध्ये देखील युक्रेनचा ड्रोन हल्ला झाला. तेथे असलेल्या निर्यातीच्या इंधन टर्मिनलला लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला झाला होता. तेथे मारा करणारी युक्रेनची अंदाजे १० ड्रोन पाडण्यात आली. या ड्रोनचे अवशेष पडल्यामुळे आग लागली, असे प्रांतीय गव्हर्नरांनी म्हटले आहे.
रात्रभरात रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने युक्रेनची ९५ ड्रोन पाडल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी केला. तर रशियानेही युक्रेनच्या हद्दीमध्ये ७२ ड्रोन, डिकॉय आणि बॅलिस्टीक क्षेपणास्त्रांचा मारा केला. यापैकी ४८ ड्रोन पाडण्यात आली किंवा निष्क्रीय करण्यात आली, असे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे.





