Russia-Ukraine War : रशियाच्या नाविक तळावर युक्रेनचा मारा; मालवाहू जहाजाला लागली आग
पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या हल्ल्यात ही पाच मजली इमारत पुर्णपणे उद्ध्वस्त झाली. बचाव कर्मचाऱ्यांनी एका बालकासह ९ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे.

Russia-Ukraine War – रशियाच्या नौदलाच्या बाल्टिक फ्लीटचा तळ असलेल्या गल्फ ऑफ फिनलंडवर रविवारी मारा झाला. त्यामुळे तेथील मालवाहू जहाजाला आग लागली होती.
त्यानंतर थोड्याच वेळात पोलंड आणि लिथुआनियाच्या सीमेजवळच्या कालिंनग्राडवर ड्रोन हल्ल्याची पूर्वसूचना देणारा इशारा देण्यात आला. जवळच असलेल्या एका नाविक तळावर ड्रोन हल्ल्यांच्या शक्यतेने हा इशारा देण्यात आला असल्याचे स्थानिक गव्हर्नरांनी म्हटले आहे.
बाल्टिस्कच्या ईशान्येस सुमारे १७० किलोमीटर अंतरावर, लिथुआनियाच्या सीमेजवळील नेमान्स्की जिल्ह्यात लिथुआनियाच्या दिशेने येणाऱ्या संशयास्पद वस्तूमुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, असे कलिंनग्राडचे गव्हर्नर अलेक्सी बेझोप्रोझवान्ख यांनी सांगितले.
मात्र अशा कोणत्याही ड्रोन हल्ल्यामध्ये आपला हात नसल्याचे लिथुआनियाने स्पष्ट केले आहे. आदल्या रात्री देशाच्या हवाई हद्दीतून कोणतेही ड्रोन किंवा तत्सम वस्तू उडताना त्यांनी नोंदवले गेले नसल्याचे लिथुआनियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान रशियाने आज युक्रेनची राजधानी कीव्ह जवळच्या एका गावातील इमारतीवर मारा केला. त्यात किमान दोघे ठार झाले आणि चौघे जखमी झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली डझनभर लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त होते आहे.
पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या हल्ल्यात ही पाच मजली इमारत पुर्णपणे उद्ध्वस्त झाली. बचाव कर्मचाऱ्यांनी एका बालकासह ९ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे. उर्वरित लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.






