War Updates: पश्चिम आशियात अमेरिका–इराण तणाव वाढल्यामुळे ‘होर्मुज सामुद्रधुनी’ जवळपास बंद झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होत असून, ऊर्जा संकट अधिक गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर (Keir Starmer) यांनी 60 हून अधिक देशांची आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत भारतानेही सहभाग घेत ठाम भूमिका मांडली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या उच्चस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवर जहाजांची मुक्त आणि सुरक्षित वाहतूक हा प्रत्येक देशाचा हक्क आहे आणि त्यावर कोणताही तडजोड होऊ शकत नाही. या संकटाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर थेट परिणाम होत असल्याची गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली. हेही वाचा – War Update : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा सर्वात उंच पूल उद्ध्वस्त बैठकीत भारताने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही ठळकपणे मांडला. खाडी प्रदेशात व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये भारताने आपल्या धाडसी नाविकांना गमावले असल्याचे नमूद करत, या संकटाचे समाधान युद्ध नसून संवादातूनच शक्य असल्याचे भारताने स्पष्ट केले. सर्व संबंधित पक्षांनी तातडीने संघर्ष थांबवून चर्चेच्या टेबलावर यावे, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वार (Randhir Jaiswal) यांनी सांगितले की, होर्मुज मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच मार्गाने भारतात मोठ्या प्रमाणावर एलपीजी, एलएनजी आणि कच्चे तेल आयात होते. भारताच्या बॅक-चॅनल राजनैतिक प्रयत्नांमुळे गेल्या काही दिवसांत सहा भारतीय जहाजे सुरक्षितपणे होर्मुज पार करण्यात यशस्वी झाली आहेत. तसेच, इराणकडून भारतीय जहाजांवर ‘टोल टॅक्स’ लावण्याच्या अफवांचेही परराष्ट्र मंत्रालयाने खंडन केले असून, अशा कोणत्याही चर्चेचा इराणसोबत संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय, लेबनानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत तैनात सुमारे 600 भारतीय जवानांच्या सुरक्षेबाबत भारताने कडक भूमिका घेतली आहे. शांतता सैनिकांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.