उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; खासदार उदयनराजे यांचं थेट आव्हान, जोरदार प्रत्युत्तर देत म्हणाले “आधी…”

MP Udayanraje Bhosale : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाचा निर्धार मेळावा काल पार पडला. वरळी येथील डोम सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठवली.
“आत्मनिर्भर भारत करणारे अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत, लोकं चोरावी लागतात, पक्ष फोडावे लागतात, चोरावे लागतात, नेते फोडावे लागतात, मतं चोरावी लागतात हे कसले आत्मनिर्भर ?”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. भाजपवाले भुरटे चोर असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.
या टीकेला आता भाजपचे सातऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, तेव्हा तीन बोटं आपल्याकडेच वळलेली असतात. बोलायचं असेल तर पुराव्यासह बोलावं, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उदयनराजे यांनी दिले आहे.
नेमकं काय म्हणाले उदयनराजे भोसले?
“ते त्यांचं मत असेल पण जर लोकांचंही तसंच मत असतं तर लोकांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेत बसवलं नसतं. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, तेव्हा तीन बोटं आपल्याकडेच वळलेली असतात. बोलायचं असेल तर पुराव्यासह बोलावं. एखाद्याचा हात पकडू शकत नाही, तसंच कोणाचं बोलणं थांबवू शकत नाही. भाजपवर आरोप करण्यापूर्वी स्वतःकडे पाहावं, असे उदयनराजे उद्धव ठाकरे यांना म्हणाले आहेत.
केंद्रीय मंत्री शाह यांच्यावर बोचरी टीका
” मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. आज एक जण येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या. पहिल्या पानावर बातमी होती, भाजप कार्यालयाचे भूमिपूजन. आत बातमी आहे. जिजामाता उद्यानात अॅनाकोंडा येणार. आपण पेंग्विन आणले. काही पेंग्विनच्या बुद्धीचे लोक आपल्यावर टीका करतात. ते सोडा. अॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप. तो येऊन गेला. त्यांना मुंबई गिळायचीय. पण त्यांना मुंबई कशी गिळू देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही.” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यातून केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली होती.
हेही वाचा : ‘घरात बसलेले अजगर, स्वतःच्या पक्षालाचं गिळून टाकलं’, चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर





