Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी

मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षाला मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे पक्षाच्या धोरणांबाबत, विरोधकांच्या टीकेबाबत आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतील. हा मेळावा शिवसेनेच्या पारंपरिक मैदानावर होणार असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बीएमसीने ही परवानगी काही अटींवर दिली आहे. त्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, स्वच्छता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. पक्षाने या अटी मान्य केल्या आहेत. गेल्या वर्षीही उद्धवसेनेला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. मात्र महापालिका निवडणुका आणि मनसेसोबत युतीच्या चर्चेमुळे यंदाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेच्या इतिहासात शिवाजी पार्क मैदानाला खूप महत्त्व आहे.
याच मैदानावर शिवसेनेचा पहिला मेळावा झाला होता. बाळासाहेबांच्या काळात या मैदानावर अनेक दमदार सभांचे आयोजन झाले, ज्यात त्यांच्या आक्रमक भाषणांनी लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. १९६६ मध्ये पक्ष स्थापनेनंतर पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून हा मेळावा पक्षाच्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचे व्यासपीठ बनले आहे.




