UAE vs OMA : यूएईच्या मुहम्मद वसीमचा टी-20 मध्ये जागतिक विक्रम, इंग्लंडच्या बटलरलाही टाकले मागे!

Muhammad Waseem Breaks T20I World Record : आशिया कप 2025 च्या सातव्या सामन्यात यूएई आणि ओमान यांच्यातील लढतीत यूएईचा फलंदाज मुहम्मद वसीमने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने सर्वात कमी चेंडूंमध्ये 3000 धावा पूर्ण करत इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरचा विक्रम मोडला.
मुहम्मद वसीमने 1947 चेंडूंमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठला, तर जोस बटलरने यासाठी 2068 चेंडू घेतले होते. या सामन्यात वसीम 54 चेंडूंमध्ये 69 धावांची खेळी खेळून बाद झाला.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद 3000 धावा करणारे फलंदाज (चेंडूंनुसार):
- 1947 चेंडू: मुहम्मद वसीम (यूएई)
- 2068 चेंडू: जोस बटलर (इंग्लंड)
- 2077 चेंडू: अॅरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया)
- 2113 चेंडू: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
- 2149 चेंडू: रोहित शर्मा (भारत)
हेही वाचा – IND vs PAK : पाकिस्तानी चाहत्यांचे घृणास्पद कृत्य, सामन्यादरम्यान सूर्याच्या पत्नीबद्दल गुगलवर करत होते सर्च
असोसिएट देशांमधील दुसरा फलंदाज –
मुहम्मद वसीमने या सामन्यादरम्यान आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण करणारा असोसिएट देशांमधील दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी मलेशियाचा विरनदीप सिंग याने हा पराक्रम केला होता.
यूएईने ठेवले 173 धावांचे लक्ष्य –
यूएई आणि ओमान यांच्यातील सामन्यात यूएईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 172 धावा केल्या आणि ओमानसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले. यूएईकडून मुहम्मद वसीमने सर्वाधिक 54 चेंडूंमध्ये 69 धावा केल्या, तर अलीशान शरफूने 38 चेंडूंमध्ये 51 धावांची खेळी केली. याशिवाय मोहम्मद जोहैबने 21 आणि हर्षित कौशिकने 19 धावांचे योगदान दिले. ओमानकडून जितेन रामानंदीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – IND vs PAK : अभिषेक शर्माने आफ्रिदीची धुलाई करत रचला नवा विक्रम! किंग कोहलीलाही टाकले मागे
आशिया कप 2025 मध्ये यूएई आणि ओमान यांनी प्रत्येकी एक सामना खेळला असून दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघांना स्पर्धेत सकारात्मक सुरुवात करण्याची आशा आहे.





