IND vs PAK : अभिषेक शर्माने आफ्रिदीची धुलाई करत रचला नवा विक्रम! किंग कोहलीलाही टाकले मागे

अभिषेक शर्माने रचला नवा विक्रम –
पाकिस्तानने ठेवलेल्या १२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने अवघ्या १३ चेंडूत ३१ धावांची खणखणीत खेळी केली. यात चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या षटकात सलग दोन चेंडूंवर चौकार ठोकत दबाव निर्माण केला. आफ्रिदीने दोन षटकांत २३ धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. अभिषेकने या खेळीत पाकिस्तानविरुद्ध पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा विक्रम नोंदवला. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, ज्याने २०२२ मध्ये २९ धावा केल्या होत्या.
अभिषेकने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या ६ षटकांत ३० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मानही मिळवला. भारत-पाक सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे. यापूर्वी नासिर जमशेद (३४ धावा) आणि इमरान (३३ धावा) यांनी ही कामगिरी केली होती. मात्र, सैम अयुबने अभिषेकला बाद करत त्याची खेळी संपुष्टात आणली.
सूर्यकुमार-तिलकने साकारली महत्त्वपूर्ण भागीदारी –
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ४७ धावांची संयमी खेळी करत भारताचा विजय सुनिश्चित केला. तिलक वर्मानेही महत्त्वपूर्ण योगदान दिले. गोलंदाजीत अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी मिळून ४० निर्धाव चेंडू टाकले, तर जसप्रीत बुमराहने १५ निर्धाव चेंडू टाकले. यामुळे पाकिस्तानी फलंदाजांवर प्रचंड दबाव निर्माण झाला, ज्याचा भारताला फायदा झाला.
हेही वाचा – IND vs PAK : भारताने हस्तांदोलन टाळल्याने पाकिस्तानात संतापाची लाट! पीसीबीची रेफरीबद्दल आयसीसीकडे तक्रार
भारत-पाकिस्तान सामन्याचा आढावा –
या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने अभिषेक शर्माच्या आक्रमक सुरुवातीच्या जोरावर आणि सूर्यकुमार-तिलकच्या स्थिर खेळीमुळे हे लक्ष्य ७ गडी राखून सहज पार केले. या विजयाने भारतीय संघाने आशिया चषकातील सलग दुसरा विजय नोंदवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.





