U-12 SA Championship Trophy : शराफत अॅकॅडमीचा पहिला विजय….

Interclub T20 Cricket Tournament – शराफत क्रिकेट अकादमी तर्फे आयोजित ‘एसए अजिंक्यपद करंडक’ १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेत शराफत क्रिकेट अॅकॅडमी आणि पुणे पोलिस बॉईज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत पहिला विजय मिळवला.
धायरी येथील सहारा क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आदित्य मोहीते याच्या अष्टपैलु खेळीमुळे पुणे पोलिस बॉईज संघाने अरेना ५५ अॅकॅडमीचा १५० धावांनी सहज पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे पोलिस बॉईजने १९० धावांचे आव्हान उभे केले. आदित्य मोहीते याने नाबाद ५६ धावांची तर, स्वयंम पाटील याने ४८ धावांची खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानासमोर अरेना ५५ अॅकॅडमीचा डाव ४० धावांवर गडगडला.
दुसर्या सामन्यात श्रीशा वाघ हिच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर शराफत क्रिकेट अॅकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट अॅकॅडमीचा २९ धावांनी पराभव करून पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले. शराफत क्रिकेट अॅकॅडमीने २० षटकात १४७ धावा धावफलकावर लावल्या.
यामध्ये भव्यराजे भोसले याने ५९ चेंडूत १३ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पेशलाईज्ड क्रिकेट अॅकॅडमीचा डाव ११८ धावांवर मर्यादित राहीला. श्रीशा वाघ हिने २० धावात ४ गडी टिपताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.





