नेवासा: ‘ज्ञान प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेत ‘चॅम्पियन्स सुपर किंगज्’ विजेता

नेवासा – नेवासा येथे नुकत्याच झालेल्या भव्य डे – नाईट क्रिकेट स्पर्धेत ज्ञान फाऊंडेशन व पसायदान स्पोर्टस् क्लब आयोजित ज्ञान प्रीमियर लीग (पर्व२) २०२५ क्रिकेट सामन्यात चॅम्पियन्स सुपर किंगज् हा संघ विजेता ठरला. तर विघ्नहर्ता बेलपांढरी हा संघ उपविजेता ठरला. या विजेत्या संघाला पंचगंगा उद्योग समुहाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर (काका) शिंदे यांच्यावतीने प्रथम बक्षिस १ लाख रुपये ट्रॉफी व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.
या झालेल्या सामान्यात प्रथम नाणेफेक जिंकून चॅम्पियन्स सुपर किंगज् या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करताना विघ्नहर्ता बेलपांढरी या संघाने ६ षटकात ८ बाद ४२ धावांचे आव्हान चॅम्पियन्स सुपर किंगज् या संघासमोर ठेवलेले होते. या धावांचा पाठलाग करताना चॅम्पियन्स सुपर किंगज् संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात ११ चेंडू शेष ठेवून हा सामना जिंकला आणि चॅम्पियन्स सुपर किंगज् संघ हा ज्ञान प्रीमियर लीगचा मानकरी ठरला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी शिवभक्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पै.अनिकेतभाऊ घुले व पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक बाबासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी घुले यांचा सन्मान पप्पू डौले व अजित मारकळी यांनी केला. तर बाबासाहेब शिंदे यांचा सन्मान सागर गंधारे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सामन्यात संकेत शिंदे या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. तसेच या स्पर्धेत अनेक बक्षिसे देण्यात आली. त्यामधील मॅन ऑफ द सिरीज हा किताब अक्षय जऱ्हाड यांना अनिकेत घुले व बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून सूरज भगत, उत्कृष्ट गोलंदाज पंकज आरंगळे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशोक कुदळे व उत्कृष्ट यष्टीरक्षक मेजर पांडुरंग गजे तसेच नवोदित गोलंदाज, नवोदित फलंदाज व नवोदित क्षेत्ररक्षक यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला नेवासा तालुक्यातील क्रिडा क्षेत्रातून विशेष कामगिरी केल्याबद्दल महेश निकम, अभिजीत हुसळे व सोमनाथ अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील सर्व संघ मालकांचा सन्मान करण्यात आला.
तसेच या सामन्याच्या विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. पहिले पारितोषिक १ लाख रुपये हे पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते चॅम्पियन्स सुपर किंगज् नेवासा या संघाला देण्यात आले, तर दुसरे पारितोषिक ७१ हजार रुपये हे विघ्नहर्ता बेलपांढरी या संघाला दीपक अकोलकर व किशोर भणगे यांच्या हस्ते देण्यात आले.
तसेच तृतीय पारितोषिक ५१ हजार रुपये हे फ्रेंड्स क्रिकेट क्लब मक्तापूर या संघाला विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहाचे मालक कमलेश ओस्तवाल यांच्या हस्ते देण्यात आले. चतुर्थ पारितोषिक ३५ हजार रुपये छत्रपती शिवाजी किंगज ब्लास्टर या संघाला संतोष निपुंगे यांच्या हस्ते देण्यात आले. तर पाचवे प्रमांकाचे पारितोषिक १५ हजार रुपये हे मक्तापुर ब्लास्टर या संघाला ॲड.संजय सुखदान यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच सहाव्या प्रमांकाचे पारितोषिक १५ हजार रुपये हे आर्यन्स या संघाला ॲड.जावेदभाई इनामदार यांच्या हस्ते देण्यात आले.





