Wagholi Cricket tournament: वाघोलीत पहिल्यांदाच रंगणार क्रिकेटचा थरार

वाघोली – महिलांना विविध क्रीडा प्रकारात स्थान मिळावे यासाठी शासनाच्या वतीने मोलाची मदत व सहकार्य केले जात आहे. वाघोलीची लोकसंख्या जवळपास तीन लाखाच्या आसपास पोहचली असून माजी उपसरपंच संदीप सातव, त्यांच्या पत्नी रत्नमाला सातव या परिवाराच्या वतीने पहिल्यांदा महिलांसाठी वाघोली प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले असून या महिलांच्या क्रिकेट स्पर्धांची वाघोलीत मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे.
याबाबतीत संदीप सातव यांनी सांगितले की, महिलांना क्रीडा प्रकारात व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने युवती, कामगार, कारखानदार, गृहिणी, उद्योजिका अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महिलांना क्रिकेट स्पर्धामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिली असून महिलांनी देखील या संधीचे सोने करण्यासाठी रोज खेळाचा सराव करण्यास सुरुवात केली असून महिलांचा या क्रीडा स्पर्धेसाठी मोठा सहभाग दिसू लागला आहे.
वाघोली मधील युवकांसाठी प्रथमच गाव चॅम्पियन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रामभाऊ दाभाडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून यात प्रथमच सोळा वर्षाखालील व 16 वर्षावरील स्पर्धकांना लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटता येणार असल्याची माहिती
माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली आहे. वाघोलीमध्ये गाव चॅम्पियन क्रिकेट स्पर्धेसाठी युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.
“वाघोली मधील महिलांना क्रिकेट या खेळाचा आनंद लुटण्यासाठी संदीप सातव, रत्नमाला सातव व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तर लहान मुलांपासून युवकांपर्यंत सर्वांसाठी गाव चॅम्पियन्स स्पर्धा आयोजित करून रामभाऊ दाभाडे प्रतिष्ठानने क्रिकेट स्पर्धांमध्ये रोमहर्षक वातावरण निर्माण केले आहे. शहरी व ग्रामीण भागात अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांची गरज समाजाला आहे.” – प्रदीप कंद (माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे)





