शिरुर: राजकीय पुढाऱ्यांची खोटी आश्वासने; क्रिकेट स्पर्धेत बक्षीस जाहीर करून दाखवला ठेंगा!

निमोणे (शिरूर) – शिरुर तालुक्यात सध्या क्रिकेट स्पर्धांची धूम सुरू असून, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक राजकीय पुढाऱ्यांकडून या स्पर्धांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जात आहे. अनेक पुढारी बक्षीस रक्कम जाहीर करून प्रसिद्धी मिळवतात, मात्र नंतर ती रक्कम देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे आयोजक अडचणीत सापडतात आणि शेवटी सर्व भार त्यांच्यावरच येतो.
अशीच एक घटना शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदोडी गावात नुकतीच घडली. येथील ओम साई क्रिकेट क्लब यांच्या वतीने ‘शिवशंभो चषक २०२५’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २४ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत शिरुरसह श्रीगोंदा, पारनेर आणि दौंड तालुक्यातील तब्बल २० संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत शिरुर ग्रामीण-न्हावरे गटातील माजी पंचायत समिती सदस्य आणि सध्या जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या तसेच तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस गटातील दुसऱ्या एका इच्छुक उमेदवाराने मोठ्या थाटात रोख रकमेची बक्षीसे जाहीर केली होती. मात्र ही फक्त घोषणा ठरली. हे दोन्ही राजकीय पुढारी ना उद्घाटनाला हजर राहिले, ना बक्षीस वितरणाला.
स्पर्धा संपेपर्यंत आयोजकांनी वेळोवेळी या पुढाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर आयोजकांनी इतर स्रोतांतून बक्षीसे उभी करून स्पर्धा पार पाडली. आयोजकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “निवडणुकीच्या वेळी हेच पुढारी गावात मतांचा जोगवा मागायला येणार आहेत. तेव्हा आम्ही योग्य उत्तर देऊ!”
बॅनरला लाखो रुपये… पण बक्षीसाला ठेंगा!
शिरुर ग्रामीण-न्हावरे गटातील इच्छुक उमेदवाराने विधानसभा निवडणुकीनंतर आमदारांच्या अभिनंदनासाठी गटातील गावागावात मोठे फ्लेक्स लावले होते. यासाठी लाखो रुपये खर्च केले गेले. मात्र क्रिकेट स्पर्धेसाठी जाहीर केलेली काही हजारांची बक्षीस रक्कम देण्यास त्यांनी साफ टाळाटाळ केली. शेवटी आयोजकांचेच खिसे रिकामे झाले, आणि पुढाऱ्यांचे खोटे आश्वासन उघडे पडले.





