येत्या तीन वर्षात गावपातळीवर दोन लाख डेअरी सुरू करणार; अमित शहांची घोषणा

मंड्या, (कर्नाटक)- येत्या तीन वर्षांत देशभरात गावपातळीवर दोन लाख प्राथमिक डेअरी सुरू केल्या जातील, ज्यामुळे शेतकऱ्यांना श्वेतक्रांतीशी जोडले जाईल असे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण करून भारतातील शेतकऱ्यांसाठी प्रगतीचा मार्ग खुला केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले.
स्वातंत्र्यानंतर लगेचच भारतीय शेतकऱ्यांनी कृषी मंत्रालयापेक्षा सहकार मंत्रालय वेगळे असावे, अशी मागणी केली होती, जर कोणी त्यावर काम केले असते तर आज भारतीय शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी असती, असे ते म्हणाले. येथील गेज्जलगेरे येथे एका मेगा डेअरीच्या उद्घाटनानंतर एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले, “या मंचावरून मी देशभरातील सहकारी संस्थांशी संबंधित असलेल्या सर्वांना सांगू इच्छितो की यापुढे त्यांच्यावर अन्याय होणार नाही, हा भारत सरकारचा निर्णय आहे.
येत्या तीन वर्षांत देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये प्राथमिक दुग्धशाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाने तीन वर्षांचा कृती आराखडा तयार केला आहे. याद्वारे आम्ही देशभरातील शेतकऱ्यांना श्वेतक्रांतीशी जोडू आणि भारताला दूध क्षेत्रात मोठा निर्यातदार बनवू असेही ते म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, आदिचुंचनगिरी मठाचे प्रमुख निर्मलानंदनाथ स्वामीजी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे सहकारमंत्री एस टी सोमशेकर आदी या वेळी उपस्थित होते. मंड्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेडने मद्दूर तालुक्यातील गेज्जलगेरे येथे आपल्या जागेवर मोठा डेअरी प्रकल्प उभा केला आहे. त्यात प्रतिदीन एक लाख लिटर दूध, दूध पावडर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जाणार आहेत. प्रकल्पाची एकूण किंमत 260.90 कोटी रुपये आहे.
कर्नाटक हे सहकारी दुग्धव्यवसाय उत्तम प्रकारे चालवणारे राज्य आहे. राज्यात 15,210 गावस्तरीय सहकारी दुग्धशाळा आहेत, जिथे 26,22,000 शेतकरी दूध पुरवठा करतात. 1975 ते 2022 पर्यंत कर्नाटकाने दुग्धव्यवसायात चांगली प्रगती केली असल्याचे सांगून मंत्री म्हणाले, 1975 मध्ये 66,000 किलो दुधावर प्रक्रिया होत होती, आता 82 लाख किलो दुधावर दररोज प्रक्रिया होत आहे.






