NCP Crisis : वाढता संघर्ष रोखणं मोठं आव्हान; देवगिरी बंगल्यावरील बैठकीला १७ आमदारांची दांडी?
NCP Crisis : देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची पार पडलेल्या बैठकीला १७ आमदार गैरहजर होते.

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आता पक्षातील अंतर्गत राजकारणाने डोकं वर काढलं आहे. शाह यांची भेट घेण्याअगोदर मुंबईत कोअर कमिटीची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर शाहांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर मंगळवारी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला १७ आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे.
आज बुधवारी सकाळी ९ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि खासदार पार्थ पवार यांच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची पार पडलेल्या बैठकीला १७ आमदार गैरहजर होते. ५० पैकी ३३ आमदार बैठकीला हजर होते. या बैठकीत हजर असलेल्या काही आमदारांनी पक्षनेतृत्वापुढे तक्रारींचा पाढा वाचला.
आपला पक्ष सत्तेत असूनही कामं होत नसल्याची तक्रार आमदारांनी बोलून दाखवली. सध्या वरिष्ठ नेत्यांमधील सुरू असलेल्या संघर्षाच्या बाबी समोर येत असल्याने पक्ष कमजोर होत असल्याची भावना देखील आमदारांनी व्यक्त केली. त्यामुळे पक्ष नेतृत्वापुढे आता अंतर्गत संघर्ष शमवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
देवगिरी बंगल्यावरील बैठक पार पडल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत पक्षात सुरू असलेल्या संघर्षाचे खंडन केले. आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे सुनील तटकरेंनी सांगितले.
Maval: भातशेतीवर ओढवले दुहेरी संकट; आधी पावसाच्या खंडाने दाणे करपले अन् आता…





