Amit Shah : “काँग्रेसची संस्कृती म्हणजे संसदेत गोंधळ” – अमित शहा
देशाची ८० वर्षांची लोकशाही अशा राजकीय डावपेचांना बळी पडणार नाही. भाजप संसद, विधानसभा आणि गावपातळीवरही काँग्रेसला प्रत्युत्तर देईल.

Amit Shah – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत गोंधळ घालणे आणि कामकाजावर बहिष्कार टाकणे हीच पक्षाची संस्कृती बनवली आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केली.
लोकशाहीत संसद हे चर्चेचे सर्वोच्च व्यासपीठ असून, विरोधकांनी तेथे विविध मुद्द्यांवर चर्चा करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. कर्नालमध्ये भाजपच्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ मोर्चाचे नेतृत्व केल्यानंतर आयोजित सभेत शहा बोलत होते.
सेक्टर १२ ते दयानंद चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, भाजप प्रदेशाध्यक्ष अर्चना गुप्ता आणि पक्षाच्या हरियाणा प्रभारी स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शहा म्हणाले की, देशाची ८० वर्षांची लोकशाही अशा राजकीय डावपेचांना बळी पडणार नाही. भाजप संसद, विधानसभा आणि गावपातळीवरही काँग्रेसला प्रत्युत्तर देईल. राहुल गांधी देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलन केले होते. निवडणुकीतील कथित अनियमिततेवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपची देशव्यापी मोहीम सुरू आहे.
विशेष अधिवेशनाचा पुन्हा प्रस्ताव
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावर (एसआयआर) चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव शहा यांनी पुन्हा मांडला. चर्चेची तयारी असल्यास विरोधकांनी संसदेत येऊन चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
भाजप घुसखोरांची ओळख पटवून त्यांची नावे मतदार यादीतून वगळू इच्छितो, तर इंडिया आघाडी त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांची माहिती जनतेला मिळण्याचा अधिकार असल्याचे सांगत शहा यांनी त्याबाबतही प्रश्न उपस्थित केले.





