अग्रलेख : संशयकल्लोळ
सध्या महाराष्ट्रातील सत्तारूढ महायुतीमध्येच (Maharashtra Politics) परस्पर रस्सीखेच सुरू झाल्याचे सातत्याने दिसून येत आहे.

Maharashtra Politics : सध्या महाराष्ट्रातील सत्तारूढ महायुतीमध्येच (Maharashtra Politics) परस्पर रस्सीखेच सुरू झाल्याचे सातत्याने दिसून येत आहे. ही रस्सीखेच भाजप आणि शिंदे सेनेत जशी आहे, तशीच ती आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या बाबतीतही सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ नुकतेच दिल्लीत अमित शहा यांना भेटले.
या शिष्टमंडळात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे इत्यादी ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता, पण त्यात सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांचा समावेश नव्हता. त्यामुळे त्या पक्षातच आता एकमेकांवर कुरघोडी करण्याचा (Maharashtra Politics) प्रकार सुरू झाला आहे काय, हे एक संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातही पुन्हा भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खाते देणे टाळले जात आहे, त्यावरूनही या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी आहेच.
अजित पवार हे अर्थखात्याचा कारभार सांभाळत होते, त्यांच्या निधनानंतर हे खाते भाजपाने आपल्याकडे तात्पुरत्या स्वरूपात घेतले. कारण त्या सुमाराला लगेचच राज्याचा अर्थसंकल्प सादर व्हायचा होता. तुलनेने नवख्या असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे तातडीने हे खाते सोपवून त्यांना थेट अर्थसंकल्पाची परीक्षा द्यायला लावणे व्यावहारिक नव्हते. त्याचा लाभ उठवत खुद्द फडणवीसांनीच अर्थखाते आपल्याकडे घेतले आणि आजतागायत ते खाते राष्ट्रवादी काँग्रेसला परत दिलेले नाही.
त्यामुळे दोन्ही पक्षात बरेच दिवस कुरबूर सुरू आहे. राज्यातल्या महायुतीत असलेल्या कुरबुरी सोडवण्याचे नवीन केंद्र सध्या अमित शहा यांचे निवासस्थान बनले आहे. यापूर्वी शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे अंतर्गत बाबींवर नाराजी व्यक्त करण्यासाठी किंवा तक्रारी करण्यासाठी अमित शहा यांना भेटायचे. आता तोच सिलसिला राष्ट्रवादी काँग्रेसनेही सुरू केला आहे. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतल्या तीन पक्षांमधील विसंवाद आता दिवसेंदिवस उग्र बनत चालला आहे याचेच हे निदर्शक मानायला हवे.
शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद विधानपरिषद निकालानंतर विकोपाला गेला आणि दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या प्रमुख प्रवक्त्यांना आणि नेत्यांना एकमेकांच्या विरोधात बोलण्याची खुली छूट दिली. त्यातून झालेली करमणूक (Maharashtra Politics) गेले आठवडाभर राज्यातल्या जनतेने अनुभवली. या दोन्ही पक्षांनी परस्परांवर सुरू केलेली आरोपांची ही राळ थांबायच्या आधीच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही फणा काढला आहे.
त्यामुळे फडणवीस यांच्यापुढे वेगळीच डोकेदुखी निर्माण झाली आहे. बारामतीत कोणा राणा नावाच्या एका उद्योगपतीवर गोळीबार झाल्याचे प्रकरणसुद्धा भाजपवर शेकवण्याचा प्रयत्न शिंदे सेनेच्या गटाकडून झाला. या राणा नावाच्या उद्योगपतीने स्वतः स्वतःवर गोळीबार झाल्याचा बनाव केला, त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो तेथून फरार झाला. पण अद्याप पुणे पोलीस त्याचा शोध घेऊ शकलेले नाहीत.
या प्रकरणाचा तपास देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे सोपवला आहे, यामागे राणा यांना वाचवण्याची खेळी आहे, असा आरोप शिंदे सेनेचे पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तिकडे नवनाथ बन नावाचे भाजपाचे प्रवक्ते शिंदे सेनेच्या नेत्यांवर तोंडसुख घेत आहेत. त्यानंतर शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी या वादात उतरत नवनाथ बन नावाच्या भाजप प्रवक्त्यांची अक्षरशः वासलात लावली आहे. राज्यातील सध्याच्या पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या वातावरणात महायुतीमधील ही आतषबाजी चांगलीच रंगात आली आहे.
राज्यात भाजपची सगळी सूत्रे एकट्या फडणवीस यांच्या हातात आहेत. महायुती सरकारची सगळी सूत्रेही त्यांच्याच हातात आहेत, पण आता विविध कारणे पुढे करून फडणवीस यांचीच कोंडी करण्याचा प्रकार मित्र पक्षांकडून सुरू आहे काय आणि त्यासाठी दिल्लीतून अमित शहा यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे काय असे उपप्रश्नही निर्माण होत आहेत.
फडणवीस आणि अमित शहा यांचे फारसे सख्ख्य नाही हा मुद्दा विविध राजकीय निरीक्षकांनी यापूर्वीच मांडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तारूढ महायुतीतले मित्र पक्षाचे नेते अमित शहा यांना महाराष्ट्रात लक्ष घालण्याची सातत्याने गळ घालत असावेत. या प्रकारामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद शांत होण्याऐवजी त्यातून वेगळेच संशयाचे वातावरण निर्माण होत आहे ते टाळण्यासाठी आता फडणवीस यांना एकतर सबुरीने घ्यावे लागेल किंवा त्यांनाच यावर तोडगा काढण्यासाठी खमकी भूमिका घ्यावी लागेल.
विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच पैकी तीन ठिकाणी महायुतीचा जो पराभव झाला तो राज्यातील भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यातही पुणे आणि नागपूर या भाजपसाठी प्रतिष्ठेच्या गणल्या गेलेल्या जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागल्याने फडणवीसांची बर्यापैकी कोंडी झाली आहे. नागपूरच्या जागेसाठी खुद्द फडणवीस यांनी फिल्डिंग लावूनसुद्धा तेथील पदवीधर मतदारसंघात भाजपचा जो लाजिरवाणा पराभव झाला तो खुद्द फडणवीस यांना चांगलाच झोंबला.
काँग्रेसवर या निकालाच्या अनुषंगाने खिल्ली उडवणारे ट्विट फडणवीस यांनी नागपूरचा निकाल लागायच्या आधी केले होते. तोपर्यंत नागपुरात भाजपचा उमेदवार आघाडीवर होता, पण अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसने भाजपवर (Maharashtra Politics) मात केल्यानंतर फडणवीस यांना हे ट्वीट डिलीट करावे लागले. अशी नामुष्की फडणवीस सहजासहजी पचवू शकत नाहीत. त्यामुळे ते एका वेगळ्याच टेन्शनमध्ये असताना मित्र पक्षांनीही त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवल्याने हा सगळा विषय आता फडणवीसांना कसोशीने हाताळावा लागेल.






