Tushar Mehta : हिंदू कायदा केवळ मनुस्मृतीवर आधारित नाही; सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचे मोठं विधान
हिंदू कायद्याला केवळ मनुस्मृतीशी जोडून पाहणे हा एक मोठा गैरसमज आहे, असे स्पष्ट प्रतिपादन देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Tushar Mehta) यांनी केले आहे.

Tushar Mehta : सध्याच्या हिंदू कायद्यांची मूळ पायाभरणी ही प्राचीन विद्वानांनी लिहिलेल्या स्मृतींवर आधारित आहे. मात्र, हिंदू कायद्याला केवळ मनुस्मृतीशी जोडून पाहणे हा एक मोठा गैरसमज आहे, असे स्पष्ट प्रतिपादन देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Tushar Mehta) यांनी केले आहे. प्राचीन ज्ञान आणि कायदेशीर समज या विषयावर आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती, नारद स्मृती आणि पराशर स्मृती अशा अनेक स्मृतींनी हिंदू कायदे परंपरेला आकार दिला असल्याचे सांगितले. तुषार मेहता (Tushar Mehta) यांनी हिंदू कायद्यातील दोन प्रमुख परंपरांचा उल्लेख केला, ज्या इसवी सन ७०० पूर्वीपासून प्रचलित आहेत. यातील मिताक्षरा परंपरा ही परंपरा विज्ञानेश्वर यांनी प्रतिपादित केली असून ती याज्ञवल्क्य स्मृतीवर आधारित आहे.
ही व्यवस्था अधिक उदार आणि काळाप्रमाणे बदलणारी होती, ज्यामध्ये जन्मापासूनच पैतृक संपत्तीत सह-वारसा हक्क मान्य करण्यात आला होता. तर दायभाग परंपरा, या परंपरेचा प्रभाव प्रामुख्याने तत्कालीन बंगाल आणि आसामच्या प्रांतांमध्ये अधिक होता.
सॉलिसिटर जनरल (Tushar Mehta) यांनी स्पष्ट केले की, हिंदू धार्मिक आणि कायदेशीर ग्रंथांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्याख्यांमधील लवचिकता होय. याच लवचिकतेमुळे काळाच्या ओघात समाजाच्या गरजांनुसार या कायद्यांमध्ये बदल होत गेले. निकटच्या नातेवाइकांमधील विवाहास बंदी सारख्या व्यवस्था प्राचीन ग्रंथांमध्येच निश्चित केल्या गेल्या होत्या, ज्या आजही आधुनिक कायद्याच्या माध्यमातून देशात लागू आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यानंतरही दीर्घकाळापर्यंत देशात ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे लागू होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने वर्ष २०२३ मध्ये भारतीय न्याय संहिता लागू करून गुन्हेगारी कायद्यांना एका सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देशाच्या गरजांनुसार नवीन आणि आधुनिक स्वरूप दिले आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.






