नवी दिल्ली- सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यातील कथित भेटीवरून तृणमूल कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यातून मेहता यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी तृणमूल खासदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते असणाऱ्या अधिकारी यांनी मेहतांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचा दावा तृणमूलकडून केला जात आहे.
मेहता यांच्यासारख्या उच्चपदस्थाने एका आरोपीची (अधिकारी) भेट घेणे अयोग्य असल्याचे तृणमूलचे म्हणणे आहे. स्वत: मेहता यांनी अधिकारी यांच्याशी भेट झाल्याचा इन्कार केला आहे.
मात्र, तृणमूल ते मानण्यास तयार नाही. नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणी तृणमूलच्या काही नेत्यांविरोधात न्यायालयीन खटला सुरू आहे. त्या नेत्यांमध्ये एकेकाळी तृणमूलमध्ये असणाऱ्या अधिकारी यांचाही समावेश आहे. त्या खटल्यात सीबीआयची बाजू मेहता मांडत आहेत. त्यापार्श्वभूमीवर, तृणमूलने मेहता आणि अधिकारी यांच्यातील कथित भेटीवर आक्षेप घेतला आहे.