“मला खोटं बोलणं जमत नाही…” ; महायुतीत नाराज असल्याचा चर्चांवर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

Chhagan Bhujbal । राज्यात मागच्या काही दिवसांपासून महायुतीमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांची वक्तव्ये सरकारच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपाची ४०० पारची घोषणा असेल, विधानसभेसाठी ९० जागांची मागणी आणि मनुस्मृतीवरून झालेला वाद असेल, या विषयांवर केलेली विधाने ही महायुतीत भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. दरम्यान,या चर्चांवर आता स्वतः भुजबळ यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे.
मला खोटं बोलणं जमत नाही Chhagan Bhujbal ।
“मी नाराज वैगरे काही नाही. मी फुले-शाहू-आंबेडकर आणि समता परिषदेच्या विचारांचा पाईक आहे. मला खोटं बोलणं जमत नाही, त्यामुळे मी माझी स्पष्ट मतं मांडतो. विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही. त्यामुळेच मी जितेंद्र आव्हाडांच्या मनुस्मृती जाळण्याच्या कृतीचे समर्थन केले. तसेच त्यांच्या हातून अनवधानाने चूक झाल्याचे म्हटले. मुंबईहून एवढ्या दूर महाड येथे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यासाठी गेले नव्हते. त्यांच्याकडून चूक झाली. पण मनुस्मृतीबाबत त्यांनी जे आंदोलन हाती घेतले, ते योग्यच आहे”, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
राज्यसभेसाठी आग्रही नाही Chhagan Bhujbal ।
छगन भुजबळ यांना राज्यसभा हवी आहे का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, राज्यसभेचं सोडा, मी लोकसभेलाही माघार घेतली. मला राज्यसभा वैगरे नको. आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच त्यांना आजच्या दिवशी अभिवादन केले पाहीजे. मनुस्मृतीनुसार महिलेला कोणताही अधिकार नाही. महिलेला स्वतंत्र मत नाही, तिला धनसंचय करण्याचा अधिकार नाही. या पार्श्वभूमीवर अहिल्याबाई होळकर यांचे कर्तृत्व कितीतरी मोठे आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आज महापुरुषांच्या विचारांना उजाळा देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा
‘मी तर बोलून बोलून थकले…’ ; सुप्रिया सुळे भाजप सरकारवर का चिडल्या?





