“महाजनादेश’ सर्वसामान्यांसाठी त्रासदायक

खासदार सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

डोर्लेवाडी- मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्रासच आहे, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेमुळे वीज खंडित करावी लागत आहे. ही यात्रा म्हणजे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक व झाडाची कत्तल करणे हे समीकरण बनले असून हे दुर्दैवी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती येथे रविवारी (दि. 15) झालेल्या कार्यक्रमात खासदार सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी (दि. 14) आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत असताना राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी “अजित दादा एकच वादा’ अशी घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. यामुळे काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही बाब अत्यंत निंदनीय आहे, असे म्हणत खासदार सुळे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.

खासदार सुळे म्हणल्या की, लोकशाही पद्धतीने कार्यकर्त्यांना घोषणा देण्याचा अधिकार आहे. बारामती जर आमच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या असतील अन्‌ दडपशाहीने जर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर हल्ला केला असेल तर मी पोलिसांच्या या कृतीचा निषेध करते. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, दडपशाही कोठेतरी थांबायला हवी, असे म्हणत खासदार सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना “टार्गेट’ केले.

Leave A Reply

Your email address will not be published.