Jejuri News : जेजुरी-मोरगाव मार्गावर भीषण अपघात; शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
Jejuri News : जेजुरी-मोरगाव राज्यमार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ एसटी महामंडळाच्या 'शिवाई' ई-बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Jejuri News : जेजुरी-मोरगाव राज्यमार्गावर शिवाई बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. २३) सकाळी सुमारे ७:४५ वाजता पेट्रोल पंपाजवळ ही दुर्घटना घडली. महेंद्र पोपट नाझीरकर (वय ३५) आणि रेश्मा महेंद्र नाझीरकर (वय ३२), रा. नाझरे कडेपठार (खैरेवाडी), ता. पुरंदर, अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. (Jejuri News)
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र आणि रेश्मा नाझीरकर हे दुचाकीवरून मोरगावहून जेजुरीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी पुण्याहून बारामतीकडे जाणारी शिवाई बस दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना बसची दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेनंतर दुचाकीवरील दोघेही काही अंतर फरफटत गेले. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. (Jejuri News)
या प्रकरणी चिमाजी पोपट नाझीरकर यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. निष्काळजीपणे आणि हयगय करून बस चालवत मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून बसचालक अनिल जीवराज आडसुळ (रा. कळंब, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील करत आहेत. (Jejuri News)
कष्टाळू दाम्पत्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ
महेंद्र नाझीरकर आणि त्यांची पत्नी रेश्मा हे अत्यंत कष्टाळू दाम्पत्य होते. महेंद्र हे किर्लोस्कर फेरस कंपनीत हंगामी कामगार म्हणून कार्यरत होते. शेतकरी कुटुंबातील असलेल्या या दाम्पत्याने परिस्थितीशी दोन हात करत जेजुरी शहरातील महाद्वार रोड आणि चिंचेच्या बागेत फळविक्रीचा व्यवसायही केला होता. (Jejuri News)
कष्ट करून संसाराचा गाडा चालवणाऱ्या या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाल्याने जेजुरी शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Jejuri News)
Jejuri News : दुर्दैवी घटना..! जेजुरीत सेफ्टी टँकमध्ये बुडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू





