‘Kalamb Pattern’: करंदीच्या सुपुत्राचा ‘कळंब पॅटर्न’ राज्यभर चर्चेत
‘Kalamb Pattern’:

दोन वर्षांत 132 शेतरस्ते, 189 किलोमीटरचे मार्ग अतिक्रमणमुक्त
विशाल वर्पे
‘Kalamb Pattern’: प्रशासकीय पदाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी किती प्रभावीपणे करता येतो, याचा आदर्श धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याचे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी घालून दिला आहे.
वर्षानुवर्षे अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेले शेतरस्ते खुले करून हजारो शेतकर्यांना दिलासा देण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेची राज्यभर चर्चा होत असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, हेमंत ढोकले हे शिरूर तालुक्यातील करंदी गावचे सुपुत्र असल्याने त्यांच्या कामगिरीमुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कळंब तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतरस्ते अतिक्रमणांमुळे वर्षानुवर्षे बंद होते. त्यामुळे शेतकर्यांना स्वतःच्या शेतात जाणे, मशागत करणे, पेरणी आणि ऊसासह अन्य शेतीमालाची वाहतूक करणे कठीण झाले होते. शेतरस्त्यांवरून होणारे वाद, बांधावरील भांडणे आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे शेतकर्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी तहसीलदार हेमंत ढोकले यांनी विशेष पुढाकार घेतला.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे आणि तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या नेतृत्वात दोन वर्षांपूर्वी या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत केवळ कार्यालयीन आदेशांपुरते काम मर्यादित न ठेवता अधिकारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचले. शेतकर्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून, गाव नकाशांनुसार रस्त्यांची मोजणी करून कायदेशीर तरतुदींच्या आधारे प्रश्न सोडविण्यात आले.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 143 तसेच मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 मधील कलम 5(2) यांचा प्रभावी वापर करण्यात आला. पर्यायी रस्ता उपलब्ध नसलेल्या ठिकाणी शेतकर्यांचे म्हणणे विचारात घेऊन सामंजस्याने मार्ग काढण्यात आला. अतिक्रमणे हटविण्याबरोबरच भविष्यात पुन्हा वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी रस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्यावरही भर देण्यात आला.
या मोहिमेत कळंब तालुक्यातील आठ महसूल मंडळांमधील तब्बल 132 शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले असून सुमारे 189 किलोमीटरचे मार्ग शेतकर्यांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. शेतीमालाची वाहतूक, ट्रॅक्टर व कृषी अवजारांची ने-आण, ऊस वाहतूक आणि शेतीच्या अन्य कामांमधील अडथळे दूर होण्यास मदत झाली आहे.
महसूलमंत्र्यांकडून ‘कळंब पॅटर्न’चे कौतुक
या कामगिरीची दखल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून कळंब तालुक्यातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे. प्रशासनाची इच्छाशक्ती, कायद्याचा योग्य वापर आणि लोकसहभाग यांच्या जोरावर ग्रामीण भागातील वर्षानुवर्षांचे प्रश्न मार्गी लावता येतात, हे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘कळंब पॅटर्न’ हा लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श म्हणून पुढे येत आहे.
आमच्या गावच्या सुपुत्राने आपल्या कर्तृत्वातून हजारो शेतकर्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला, ही गावासाठी निश्चितच गौरवाची बाब आहे. अधिकारी म्हणून मिळालेले पद ही जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीतून सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडविणे हेच खरे कर्तृत्व असते, याचा प्रत्यय हेमंत ढोकले यांनी आपल्या कामातून दिला आहे. करंदीच्या मातीत घडलेल्या या सुपुत्राच्या कामगिरीने गावाचा लौकिक राज्यभर उजळला आहे.
-प्रवीण ढोकले, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शिरूर-आंबेगाव





