Nasrapur News : नसरापूर येथे पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४,९१० बालकांना पाजले पोलिओचे दोन थेंब!
Nasrapur News : बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूर कार्यक्षेत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Nasrapur News : बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (Nasrapur News)
पंचायत समिती भोरच्या सभापती मनीषाताई कंक यांच्या हस्ते बालकाला पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विशालदादा कोंडे उपस्थित होते. (Nasrapur News)
या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूर कार्यक्षेत्रातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ५,००३ बालकांना पोलिओचे डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी परिसरात ५३ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते, तर दुर्गम भागातील तसेच बूथपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी ३ मोबाईल टीमची व्यवस्था करण्यात आली होती. (Nasrapur News)
या नियोजनबद्ध मोहिमेत एकूण ४,९१० बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले. त्यामुळे उद्दिष्टित बालकांपैकी ९८.१४ टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. (Nasrapur News)
मोहिमेदरम्यान लसीकरणापासून वंचित राहिलेल्या उर्वरित बालकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आयपीपीआय मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी संबंधित बालकांच्या घरी भेट देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करणार आहेत. त्यामुळे कोणतेही बालक पोलिओच्या लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. (Nasrapur News)
या शुभारंभप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद आहिरे आणि डॉ. पद्मवीर थोरात उपस्थित होते. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी मोहिमेच्या नियोजनात व अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. (Nasrapur News)
या संपूर्ण मोहिमेच्या यशस्वितेसाठी दोन्ही वैद्यकीय अधिकारी, सर्व उपकेंद्रांतील आरोग्य सेवक व सेविका, आशा कार्यकर्त्या यांच्यासह एकूण ११२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने केलेले नियोजन आणि कर्मचारी वर्गाने घेतलेली मेहनत यामुळे नसरापूर परिसरात लसीकरणाची समाधानकारक टक्केवारी गाठता आली. (Nasrapur News)
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांना आवाहन केले की, प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे अत्यंत महत्त्वाचे असून, कोणत्याही कारणास्तव बालकाचे लसीकरण राहिले असल्यास पालकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून लसीकरण पूर्ण करून घ्यावे. बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. (Nasrapur News)





