Tree Collapse: पिंपळे सौदागरमध्ये मोठी दुर्घटना! भर पावसात काम सुरू असताना झाड कोसळलं, चौघे जखमी
Tree Collapse: रस्त्यालगतचे महाकाय झाड अचानक पादचाऱ्यांच्या अंगावर कोसळले; स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.

Tree Collapse – शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारची घटना पिंपळे सौदागर येथील हॉटेल आयकॉन परिसरात शनिवारी सकाळी घडली. रस्त्यालगत उभे असलेले एक मोठे झाड अचानक उन्मळून पडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेच्या वेळी काही नागरिक पायी जात होते.
झाड त्यांच्या अंगावर पडल्याने तीन जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनास्थळी सध्या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे झाडांची मुळे आधीच ओलसर व कमकुवत झालेली असताना, रस्ते खोदकाम आणि सुरू असलेल्या विकासकामांमुळे झाडांच्या मुळांवर अतिरिक्त ताण येत आहे.
यामुळे भर पावसात अशा प्रकारची रस्त्याची कामे सुरू करण्यामागचे नियोजन काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यात विकासकामांमुळे झाडांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत असल्यास अशा कामांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत परिस्थिती नियंत्रणात आणली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पावसाळ्यात सुरू असलेल्या कामांची तपासणी, धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




