Bhosari Accident – एका भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास टाटा मोटर्स गेटसमोर शाहुनगर, चिखली येथे घडली. शिवरामा कृष्णन (वय ७६, रा. चिखली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात त्यांच्या सुनेने शनिवारी (दि. १४) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एचआर ७३ बी ७३४०) या ट्रकवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास फिर्यादीचे सासरे त्यांच्या दुचाकीवरून चिंचवडला चालले होते. ते टाटा मोटर्स गेटसमोर शाहुनगर, चिखली येथील बीआरटी रोडलगत आले असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. धडकेमुळे ते खाली पडले आणि ट्रकचे पुढचे टायर त्यांच्या दोन्ही पायांवरून गेले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.