Shivendrasinhraje Bhosale: धोकादायक वळणं, खोल दऱ्या… आंबेनळी घाटाचा थरार संपणार? शिवेंद्रसिंहराजेंची मोठी घोषणा
Shivendrasinhraje Bhosale: अपघातप्रवण रस्त्यांवर हाय-टेक सुरक्षा उपाययोजना; कुंभरोशी ते महाबळेश्वर मार्गाच्या रुंदीकरणाला लवकरच सुरुवात होणार.

Shivendrasinhraje Bhosale – नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रस्त्यांच्या विकासाबरोबरच सुरक्षा हा प्रत्येक प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे. राज्यातील अपघातप्रवण मार्गांवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवण्यास शासन कटिबद्ध आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत सांगितले.
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात वारंवार घडणार्या अपघातांसंदर्भात बुधवारी (दि. 24) उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक सतत वाढत असल्याने, रस्त्याची क्षमता वाढविणे आणि सुरक्षा उपाययोजना बळकट करणे आवश्यक आहे.
त्यासाठी राज्य शासनाकडून विविध टप्प्यांमध्ये कामे हाती घेण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते कुंभरोशी (प्रतापगड पायथा) या राज्य महामार्ग क्र. 131 वरील 24.2 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणा व रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) मार्फत हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल अंतर्गत प्रगतिपथावर आहे. यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण, मजबूत डांबरीकरण, सुरक्षेसाठी सुविधा आणि आधुनिक तांत्रिक उपाययोजनांचा समावेश आहे.
यामध्ये 14 किलोमीटर लांबीच्या 5.50 मीटर रुंदीच्या रस्त्याचे सात मीटर रुंदीपर्यंत डांबरीकरण करण्यात येत आहे. दोन्ही बाजूंना 1.50 मीटर रुंदीचे खांदे विकसित केले जात आहेत. उर्वरित 10 किलोमीटर रस्त्याचेही रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येत आहे. कुंभरोशी ते महाबळेश्वर या मार्गावरील 16.30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
तीव्र उतार, अवघड वळणे आणि खोल दर्यांमुळे आंबेनळी हा संवेदनशील घाटमार्ग असल्याने, या मार्गावर सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. घाटातील धोकादायक ठिकाणी अँटीक्रॅश बॅरिअर्स, मजबूत सुरक्षा कठडे, संरक्षक भिंती, रिफ्लेक्टर, कॅट-आइज्, परावर्तित दिशादर्शक फलक आणि सूचना फलक बसवण्यात आहे. त्यामुळे रात्री आणि धुक्यामध्येही वाहनचालकांना रस्ता स्पष्टपणे दिसण्यास मदत होणार आहे.
आंबेनळी घाटात 24 मे रोजी झालेला अपघात वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अपघातस्थळी रस्त्याची रुंदी 14 मीटर असून, तेथे सुरक्षा कठडे, अँटीक्रॅश बॅरिअर्स आणि दिशादर्शक फलक उपलब्ध होते. याची नोंद पोलिस पंचनाम्यात करण्यात आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहितीही मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.





