Traffic Police: वाहतूक पोलिसांचा वादग्रस्त निर्णय? भरदुपारी पुन्हा रस्त्यावर धावणार आरएमसी मिक्सर
Traffic Police: शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेतच अवजड वाहनांना मुभा दिल्याने अपघातांची शक्यता; प्रदूषण आणि वाहतूक कोंडी वाढण्याची नागरिकांमध्ये भीती.

Traffic Police – काही प्राणांतिक अपघातानंतर अवजड वाहनांना प्रवेशाबाबत वेळांचे नियम घालून दिले होते. परंतु आता वाहतूक पोलिसांनी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) मिक्सर वाहनांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रवेशबंदीतून सूट देण्यात आली आहे. आरएमसी असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रवेशबंदीच्या वेळेत अंशतः शिथिलता देण्यात आली असून,
हा निर्णय २९ जुलै २०२६ पासून एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि बांधकाम क्षेत्रालाही दिलासा देणे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आरएमसी मिक्सर वाहनांना प्रवेशबंदीतून सूट देण्यात आली आहे.
मात्र, सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवेशबंदी कायम राहणार आहे. शनिवार आणि रविवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत प्रवेशबंदी लागू राहील. उर्वरित वेळेत आरएमसी वाहनांना शहरात वाहतूक करण्याची परवानगी असेल. वाहतूक शाखेने या सवलतीसोबत काही महत्त्वाच्या अटीही घातल्या आहेत.
प्रत्येक आरएमसी वाहनावर ३६० अंश कॅमेरा बसविणे किंवा क्लिनर ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच प्लांटमधून वाहन बाहेर पडण्यापूर्वी चालकाची डी.डी. मशीनद्वारे तपासणी करणेही अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, डंपर, हायवा, ट्रक आणि इतर जड वाहनांसाठी कोणतीही सवलत देण्यात आलेली नसून,
त्यांच्यासाठी पूर्वीचेच वाहतूक नियम लागू राहणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे शहरातील बांधकाम प्रकल्पांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असला, तरी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस वाहतूक शाखेने केले आहे.
शाळेच्या वेळा
सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आरएमसी मिक्सर वाहनांना प्रवेशबंदीतून सूट देण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब अशी की सकाळच्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालय सुटण्याच्या आणि दुपारच्या सत्रातील शाळा भरण्याची वेळ असते. गेल्या काही महिन्यात अवजड वाहने लहान मुले,
महाविद्यालयीन तरुणी यांच्या मृत्यूचे कारण ठरली आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तसेच आरएमसी प्लांट असणाऱ्या परिसरात आणि ही वाहने ज्या मार्गाने जातात, त्या परिसरात प्रदूषण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






