Bhupendra Patel: “महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊच!” गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे मोठे विधान
Bhupendra Patel: एखादी संस्था १०० वर्षे प्रगतिपथावर चालवणे ही मोठी आत्मगौरवाची गोष्ट; दि पुना गुजराती केळवणी मंडळाच्या कार्याचे कौतुक.

Bhupendra Patel – महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊच आहे. गुजरात आणि गुजरातींची प्रगतीमध्ये महाराष्ट्राचाही वाटा आहे. महाराष्ट्रातील गुजराती माणूस पैशांअभावी वंचित राहता कामा नये. खेळाचे प्रशिक्षण, आरोग्यविषयक उपचार किंवा शिक्षण, असो तो कोणत्याही गोष्टींपासून वंचित राहता कामा नये. जरूर पडली, तर आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रविवारी व्यक्त केला.
दि पुना गुजराती केळवणी मंडळाच्या स्थापना शताब्दी वर्षानिमित्त आयोजित महोत्सवाला पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी महापौर मंजुषा नागपुरे, मंडळाचे अध्यक्ष राजेश शहा, प्रमुख संजय देसाई, उपाध्यक्ष जनक शहा, सचिव हेमंत मणियार, कोषाध्यक्ष महेश धारोड, सह कोषाध्यक्ष प्रमोद शहा, संदीप शहा, दिलीप जगड, जितेंद्र मेहता, संदीप शहा, विनोद देढिया आदी उपस्थित होते.
आज कारगील विजय दिवस आहे. यानिमित्ताने सर्व सैनिकांना मी हृदयपूर्वक नमन करतो. महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांचे स्मरण होणार नाही, असे होणार नाही. त्यांच्या शौर्यालाही माझे कोटी प्रणाम, असे पटेल म्हणाले. गुजराती माणसाने गुजराती माणसाचा गौरव करणे ही मोठी गोष्ट नाही; परंतु एखादी संस्था १०० वर्षे चालवणे आणि त्यातूनही ती प्रगतिपथावर ठेवणे ही स्वत:च एक मोठी आत्मगौरवाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार पटेल यांनी संस्थेविषयी काढले.
सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, सब का प्रयास, हा पंतप्रधानांनी सांगितलेल्या विकासाचा मंत्र तुम्ही येथे सिद्ध करून दाखवला आहे. गुजराती समाज महाराष्ट्रात आला. व्यापार, शिक्षण, उद्योग या सगळ्यात त्याने योगदान दिले. दुधात साखर मिसळावी, त्याप्रमाणे महाराष्ट्रात ते मिसळून गेले. महाराष्ट्राच्या सुखात सुख मानले आणि दुखा:तही सहभागी झाले, हा गुजराती माणसांचा स्वभाव आहे, असे पटेल म्हणाले.





