Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी फुटणार; ३ प्रमुख बोगद्यांसह रिंगरोडला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Pune News : पुणे शहर व परिसरातील बिकट होत चाललेली वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत मोठे पाऊल उचलले आहे.

Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाताळलोक प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरात तीन ठिकाणी बोगदे तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये भोसरी ते उंड्री – नवीन विमानतळ (३६ किमी यामध्ये १० किमी एलिव्हेटेड), रामनदी- भूगाव ते राजाराम पूल (८ किमी) आणि तळजाई टेकडी ते पद्मावती-हिंगणे (१.६५ किमी) या बोगद्यांचे प्रस्तावित आहे. या बोगद्यांच्या जाळ्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची अथवा तज्ज्ञांची मदत घेऊन सर्वंकष सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Pune News)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांच्या नियोजन, वित्तीय व्यवस्थापन, अंमलबजावणी, देखरेखीसाठी गठित उच्चस्तरीय समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता आदीं उपस्थित होते. (Pune News)
पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता उन्नत सामुहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुणे अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे हे तीन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. (Pune News)
या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Pune News)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उच्चक्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर) हा पुण्याच्या भविष्यातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा एक परिवर्तनकारी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. एचसीएमटीआर व बोगदा प्रकल्प हे पुणे शहराला अधिक कार्यक्षम, वाहतूक सुलभ व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. (Pune News)
या तीनही प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका व पुणे महानगर विकास प्राधिकरण यांना देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावे. तसेच रिंगरोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला देण्यात यावी. (Pune News)
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ४३.६० किमी अंतराच्या या प्रकल्पामुळे २५ ते ३० टक्के वाहतूक कमी होणार आहे. यामुळे सर्व मेट्रोमार्गिका जोडल्या जाणार असून रस्त्याची वाहतूक क्षमता वाढणार आहे. (Pune News)
त्यामुळे एचसीएमटीआर या प्रकल्पाचे काम लवकर सुरू करुन २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. यासाठीचे आर्थिक मॉडेल तयार करून प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. (Pune News)
पीएमआरडीएद्वारे राबविण्यात येणारा अंतर्गत रिंग रोड हा प्रकल्प ८३.१२ किमीचा असून यामध्ये ४४ गावांचा समावेश आहे. या अंतर्गत रिंग रोडचे काम पाच टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाची प्रक्रिया येत्या सहा ते सात महिन्यांत पूर्ण करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. रोख मोबदला देऊन रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. (Pune News)
पीएमआरडीएच्या प्रस्तावित नगररचना (टीपीएस) योजनासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. पीएमआरडीए व पुणे महापालिकेच्या १५ नगर रचना योजना प्रस्तावित असून या योजना रद्द करण्यासंदर्भात पीएमआरडीएने आपल्या स्तरावर प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. (Pune News)





