Pune District : लाच घेताना वाहतूक नियंत्रक जाळ्यात
Pune District : अनिल बनकर हे बारामती एमआयडीसी डेपो येथे वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असून स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे संचालकही आहेत.

बारामती : प्रलंबित बिले व ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी तब्बल सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर चार लाख रुपये स्वीकारताना बारामती एमआयडीसी डेपोतील वाहतूक नियंत्रक अनिल तुकाराम बनकर (वय ५१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथील पोलीस निरीक्षक संतोष बुधा पाटील यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बनकर हे बारामती एमआयडीसी डेपो येथे वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असून स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे संचालकही आहेत.
तक्रारदार हे फर्निचर व्यवसायिक असून त्यांच्या फर्ममार्फत स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेच्या नवीन इमारतीतील फर्निचरचे काम करण्यात आले होते. या कामाची एकूण किंमत ४८ लाख ६० हजार ४५५ रुपये होती. त्यापैकी ४० लाख रुपये अदा करण्यात आले होते. मात्र, फर्निचरच्या कामाचे ८ लाख ६० हजार ४५५ रुपये तसेच इतर कामांचे ४ लाख ९८ हजार रुपये अशी रक्कम प्रलंबित होती.
फिर्यादीनुसार, ही प्रलंबित बिले व ठेव रक्कम वरिष्ठ स्तरावर मंजूर करून देण्यासाठी आरोपीने सुरुवातीला पाच लाख रुपयांची लाच मागितली. नंतर पडताळणीदरम्यान सहा लाख रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर चार लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार २३ जुलै रोजी बारामती येथे सापळा रचण्यात आला.
बारामती एस.टी. बसस्थानकासमोरील बारामती–इंदापूर मार्गावरील परिसरात आरोपीने आपल्या ताब्यातील इर्टिगा (एमएच-४२-बीई-५७८७) या वाहनात पंच साक्षीदारासमक्ष तडजोडीनुसार चार लाख रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान चार लाख रुपयांची लाचेची रक्कम, मोबाईल फोन, संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे, गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.





