Pune District : मुळशी धरणातून विसर्ग 10 हजार क्युसेकने विसर्ग
Pune District : मुळा नदीच्या काठावरील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

पौड : मुळशी धरणातील पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहोचला असून धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग वाढविण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे.
धरणातून सध्या 8,100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, शुक्रवार (दि. 24) दुपारी 1 वाजल्यापासून तो 10 हजार क्युसेक केला असल्याची माहिती टाटा पॉवरच्या मुळशी धरण प्रशासनाने दिली. पावसाचा जोर कायम राहिल्यास अथवा धरणातील पाण्याची आवक वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुळा नदीच्या काठावरील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. नदीपात्रात कोणत्याही कारणासाठी उतरू नये, तसेच नदीपात्रात असलेले साहित्य, जनावरे आणि इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असेही सूचित करण्यात आले आहे.
सखल भागातील नागरिकांना याबाबत त्वरित सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. टाटा पॉवरच्या मुळशी धरणाचे प्रतिनिधी सुरेश कोंडूभैरी यांनी ही माहिती दिली. तसेच मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.





