तुंग किल्ल्यावरून कोसळून पर्यटक गंभीर जखमी

पवनानगर : पवन मावळ विभागातील तुंग (कठिणगड) किल्ल्यावर फिरण्यासाठी पुणे येथील काही मित्रांचा ग्रुप आला होता. या ग्रुपमधील एक तरुण पर्यटक किल्ल्यावर जात असताना पाय घसरून किल्ल्यावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाला. या तरुणाच्या डोक्याला आणि चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली.
सदर घटनेची माहिती मिळताच किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान मावळच्या दुर्गसेवकांनी घटनास्थळी जाऊन जखमी पर्यटकास स्ट्रेचरच्या साहाय्याने गडाखाली आणले व तातडीने लोणावळा येथील रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले. इशान विमोज (रा. पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
पावसाळा सुरू झाल्याने मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर गर्दी वाढत आहे. पवन मावळ येथील तुंग (कठिणगड) किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या मित्रांच्या ग्रुपमधील इशानचा किल्ल्यावर जाताना पाय घसरला आणि तो किल्ल्यावरून ७० फूट खाली कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.
ही माहिती दुर्गसेवक गुरूनाथ शेडगे, अनिकेत कदम, प्रकाश कदम, सचिन पांगरे, संदीप वाघमारे, नवनाथ शेडगे यांना मिळताच त्यांनी तिथे जात जखमी तरुणास व्यवस्थितरित्या खाली आणले आणि आपल्या वाहनातून लोणावळा येथील रुग्णालयात दाखल केले. यामुळे जखमी तरूण इशान विमोज याचे प्राण वाचले आहेत. दुर्गसेवकांच्या या तत्परतेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तसेच गडावर येताना पर्यटकांनी काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.





