Pimpri : भाद्रपद पोळ्यानिमित्त बाजारपेठा सजल्या

पवनानगर : पुणे जिल्ह्यासह मावळ तालुक्यात येत्या रविवारी (दि. २१) साजऱ्या होणाऱ्या भाद्रपद पोळ्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी दुकाने सजली असून शेतकरी बांधवांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.
वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाला एक दिवस विश्रांती मिळावी आणि त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. विदर्भासह मराठवाड्यात श्रावण अमावस्येला तर पुणे जिल्ह्यात भाद्रपद अमावस्येला पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
बाजारपेठेत बैलांच्या पाठीवर टाकण्यासाठी रंगीबेरंगी झुल, घुंगरूचे पट्टे, हिरव्या रंगाचे गोंडे, पितळी घंटा, कवड्यांच्या माळा, रंगीत दोरे, तसेच पोळ्याच्या सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणावर आले आहे. अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांनी आपापल्या बैलांसाठी नव्या झुली, घुंगरू, आणि साजसामान खरेदी करण्यासाठी झुंबड उडवली आहे.
भारतीय संस्कृतीत श्रावण आणि भाद्रपद महिन्यात सण-उत्सवांची उधळण सुरू असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांच्यानंतर पोळा हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा सण मानला जातो. पोळ्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी बाजारपेठेत बैलांसाठीच्या वस्तूंसोबत मातीचे बैल, शोभेच्या वस्तू, तसेच मुलांसाठी खेळणी यांचीही विक्री होत आहे. दुसरीकडे, सोमवारी (दि. २२) घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असल्याने नवरात्रीसाठी लागणाऱ्या पुजेच्या साहित्याची खरेदीही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे गावोगावी बाजारपेठा गजबजल्या असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





