Pimpri : लोहगड-विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाऊंडचा वेढा

पवनानगर : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड आणि विसापूर किल्ल्यांच्या पायथ्याला सध्या तारेच्या कंपाउंडचा वेढा पडला असून, या ऐतिहासिक गडकोटांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. स्वराज्याच्या इतिहासात मानाचे स्थान असलेल्या या किल्ल्यांचे नुकतेच जागतिक वारसा स्थळासाठी नामांकन झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक गडकोट किल्ले परिसर हळूहळू अतिक्रमणाने वेढले जाऊ लागले आहेत. शासनाने त्वरित या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
गडावरील अतिक्रमणाकडे आता शासन लक्ष देऊ लागले परंतु गड पायथ्याला व परिसरात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा खरेदी करून त्या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली मोठ मोठे उदयोग सुरू झाले आहेत. गड किल्ले परिसरात होणारा विकास हा हा नियमानुसार आहे की नाही? हे देखील तपासले जात नाही. बऱ्याच ठिकाणी असलेले वनीकरण हटवून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झोन करण्याचे प्रकार सुरू आहेत. स्थानिक लोकांच्या नावाखाली या जागा उद्योगपतींना विकायच्या असे बरेच प्रकार ऐकायला येतात. असाच प्रकार लोहगड विसापूरच्या परिसरात जाणवत आहे.
नो डेवलपमेंट झोन करण्याची गरज
किल्ले परिसरातील काही जागा नो डेवलपमेंट झोन करणे गरजेचे आहे. तरी शासनाने या विषयावर त्वरित दखल द्यावी या आशयाचे निदवेन लोहगड विसापूर विकास मंचच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. सदर निवेदनात गड परिसराची तातडीने मोजणी करावी, जंगलांचे ड्रोनद्वारे चित्रण करावे, गड परिसरातील काही भाग नो डेवलपमेंट झोन म्हणून घोषित करावा, अतिक्रमण व अनधिकृत व्यवसायांवर तातडीने कारवाई करावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
एतिहासिक एश्वर्याची साक्ष देणारा किल्ला
लोहगड-विसापूर विकास मंचचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी यासंबंधी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडांभोवती तारेचा विळखा घातला आहे. हेच गड जिथे शिवरायांनी सुरतची संपत्ती ठेवली, जिथे नेताजी पालकर, कान्होजी आंग्रे यांनी वास्तव्य केलं, जिथे पेशवे काळात संपत्ती ठेवली गेली आणि डागडुजी झाली, आज मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात अडकत आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पर्यटनाच्या नावाखाली गड परिसरात मोठ्या प्रमाणावर जागा खरेदी होत असून, व्यावसायिक प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यामुळे गड परिसरातील जंगल नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. असाही मत टेकवडे यांनी मांडले.
पर्यावरणीय संकट
याच पार्श्वभूमीवर पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राहुल रमेश मुंगीकर यांनी देखील परिसरातील पर्यावरणीय संकटावर लक्ष वेधले आहे. लोहगड परिसरात पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती आणि जैवविविधता मोठ्या प्रमाणात होती. मात्र वाढत्या पर्यटनामुळे येथील परिसंस्था धोक्यात आली आहे. वृक्षतोड, गर्दी आणि व्यावसायिक दुकाने यामुळे अनेक पक्षी, सरीसृप व प्राण्यांचे अस्तित्व संकटात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.





