Pimpri : मावळ तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था

पवनानगर : तालुक्यातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने अद्याप योग्य दखल घेतलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक संघटनांकडून प्रशासनाला निवेदने सादर करण्यात आली असून, काही ठिकाणी नागरिकांनी रस्त्यांवर उतरून आंदोलनही केले आहेत.
मावळ तालुका निसर्गसंपन्न आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक लोणावळा, भुशी धबधबा, टायगर पॉईंट, पवन मावळ, अंदर मावळ, नाणे मावळ, कामशेत, वडगाव, तळेगाव, सोमाटणे या भागांत पर्यटनासाठी दाखल होतात. परंतु सध्या या पर्यटनस्थळांपेक्षा खड्डेच पर्यटकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिक व वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.
मावळ तालुक्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून, खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना धोका वाढला आहे. मोटारसायकलस्वारांचे विशेष हाल होत असून, लहान अपघातांची मालिका सुरु आहे. नागरिकांनी या बाबत वारंवार निवेदने आणि निदर्शने केली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने लोकांच्या संयमाचा बांध तुटू लागला आहे.
सहा कोटी खर्च आणि वर्षभरातच दुर्दशा
तालुक्यातील ठाकुरसाई-जवण हा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता मागील वर्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल सहा कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आला होता. परंतु केवळ एका वर्षाच्या आतच या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे खचल्याचे दिसून येते. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
सोशल मीडियावर नागरिकांचा संताप
खराब रस्त्यांविरोधात नागरिक आता सोशल मीडियावरून प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त करत आहेत. फेसबुक, एक्स (ट्विटर), आणि इन्स्टाग्रामवर नागरिकांनी रस्त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत शासन आणि प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
तात्काळ दखल घेण्याची मागणी
मावळ तालुका पर्यटनदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग असून, येथे येणाऱ्या पर्यटकांचा पहिला अनुभवच जर खड्डेमय रस्त्यांचा असेल, तर परिसराच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सर्व रस्त्यांची पाहणी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी आणि नागरिकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.





