Pimpri : प्रशासनाला उशिरा सुचले शहाणपण

पवनानगर : जे काम उन्हाळ्यातच होणे अपेक्षित होते ते काम पाऊस कोसळत असताना आणि धरण ७५ टक्के भरल्यानंतर सुरू करण्यात आले आहे. धरणातून विसर्ग देखील सुरू झाला आहे. त्यानंतर पवना धरण प्रशासनाने सांडव्यावरील डागडुजीचे काम हाती घेतले आहे.
मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्यभरात गेल्या महिन्याभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परंतु पवना धरणाच्या सांडव्यावरील डागडुजीचे काम हे धरण ७५ टक्केच्यावर भरल्यावर सुरू करण्यात आले आहे. तसेच धरणातून गेल्या चार दिवसांपासून सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
मात्र जड क्रेन मशीन व त्यावरील ८ ते १० कर्मचारी धरणाच्या सांडव्यावर उभे राहून सांडव्याच्या बकेटला येण्या जाण्यासाठी पायऱ्यांचे काम सकाळी ११ च्या सुमारास करण्यास सुरू केले असल्याने धरणा खालील नागरिकांनमध्ये धरणाचे दरवाज्यात बिघाड झाली का काय? अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आणि अफवाही सुरू झाल्या.
हे काम जून महिन्यापूर्वीच करून घेणे गरजेचे होते. ते न झाल्याने अधिकारी करतात तरी काय ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. इतक्या महत्त्वपूर्ण कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मे महिन्यात काम का केले नाही?
मे महिन्यामध्येच पावसाचा अंदाज घेऊन धरणाच्या डागडुजीची कामे पूर्ण करून घ्यायला हवी होती. पावसाळ्यापूर्वी ही कामे का पूर्ण केली नाहीत? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हे काम हे ऐन पावसाळ्यात व पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर करावे लागत आहे. दरवाजा उघडत नसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.





