Pimpri : ‘आत्मा’ अंतर्गत भरली महिलांची शेतीशाळा

पवनानगर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत आढले खुर्द येथे महिलांसाठी भात पीक शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रकल्प संचालक (आत्मा) पुणे सूरज मडके व तालुका कृषी अधिकारी, मावळ मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मार्गदर्शनपर शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. शेतकरी शेतीशाळा ही शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध टप्प्यांमध्ये जसे भात बियाणे निवड, गादी वाफ्यावर रोपे तयार करणे, नियंत्रित लागवड करणे, युरिया ब्रिकेटचा वापर करणे, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राबविली जाते.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी नागेश शिंदे, भात संशोधन केंद्र, वडगावचे शास्त्रज्ञ एस.एम कदम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, कृषी सहाय्यक एम बी घोडके, एस एस कानडे, प्रगतशील शेतकरी मनोहर गायकवाड, सरपंच नंदा भालसेन तसेच शेतीशाळेतील महिला शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रथमतः घोडके यांनी आधी झालेल्या शेतीशाळा वर्गाचा मागोवा घेतला.
यानंतर शेतकऱ्यांना भाताची नियंत्रित लागवड करणे, युरिया ब्रिकेटचा वापर करणे, रासायनिक खतांचा वापर इ.याबाबत कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कुसगावचे प्रगतिशील शेतकरी मनोहर गायकवाड यांनी नियंत्रित भात लागवडीसाठी दोरी तयार कशी करायची याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी शिंदे यांनी शेतीशाळेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांना शेतीशाळा किटचे वाटप करणेत आले. या शेतीशाळेचे नियोजन आढले गावच्या सहाय्यक कृषि अधिकारी एम.बी घोडके, एस एस कानडे व आत्माचे बी.टी.एम राहूल घोगरे यांनी केले. भात पिकाबद्दल सविस्तर माहिती मिळाल्यामुळे महिला वर्गातून या बाबत समाधान व्यक्त करण्यात आले.





