सलग सुट्ट्यांमुळे राज्यातील पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे हाऊसफुल्ल

शिर्डी – स्वातंत्र्यदिन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची तसेच भक्तांची राज्यातील विविध तिर्थक्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आहे. बुलढाण्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि मंदिर परिसरात राज्यासह पर राज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
सकाळ पासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहे. त्यामुळे दर्शनासाठी तब्बल तीन ते साडे तीन तास लागत आहेत. यामुळे शेगावातील सर्व खाजगी हॉटेल्स आणि लॉज हाऊसफुल्ल झाली असून पुढील दोन दिवसांत ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यासह शिर्डीतही शनिवार सकाळपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. रविवारी पहाटे काकड आरतीनंतर दर्शन रांगांमध्ये सुद्धा भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. पंधरा मिनिटांत होणाऱ्या दर्शनाला त्यामुळे तब्बल दोन ते तीन तास लागत आहेत. साई भक्तांचे दर्शन सुकर व्हावे यासाठी साई संस्थांनी सुद्धा जय्यत तयारी केली असून गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरातही तुफान गर्दी
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी उसळली आहे. पहाटेपासून मंदिराबाहेर जवळपास 300 मीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक धबधबेही प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे इथले निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून उठले असून प्रत्येकजण या निसर्गाच्या प्रेमात पडतो आहे. याबरोबरच उत्तर भारतीयांचा श्रावण सध्या सुरू असल्याने परराज्यातील भाविक शंकराच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत.





