Saktipeeth Highway : शेतकऱ्यांनी जमीनी देण्यास केलेल्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या पूर्वीच्या आखणीत बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यःस्थितीतील १८ तासांचा प्रवास ८ तासावर येणार आहे. सुधारित आराखड्यानुसार, आता हा मार्ग १३ जिल्ह्यांतील ४० तालुके आणि ४०० गावांमध्ये जात असून माहूर, तूळजापूर, कोल्हापूर या शक्तीपीठांसह २१ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळं गोव्याला जाणं देखील आता सोपं होणार आहे. खर्च एक लाख १ हजार कोटींवर दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात महत्त्वाचा बदल करण्यात आल्याने प्रकल्पाचा खर्च १ लाख १ हजार कोटींवर पोहोचला आहे. त्यानुसार आता नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आखणीत बदल करण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्याचा समावेश केला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या मुळ आखणीस सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये मान्यता देत भूसंपादनाचे आदेश दिले होते. त्यानुसार एमएसआरडीसीने या ८०२ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा आराखडा तयार केला होता. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांच्या विरोधामुळे राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द केली होती. दरम्यान फेब्रुवारी २०२४ मध्येच या महामार्गाच्या मूळ आराखड्याला मान्यता मिळाली होती. त्यानुसार हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांतून जाणार होता. नंतर पुढे हा महामार्ग कोकण एक्स्प्रेसवेला महाराष्ट्र- गोवा हद्दीवर जोडणार होता. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून या प्रकल्पास तीव्र विरोध परंतु महामंडळाने या प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू करताच कोल्हापूर, सांगली जिल्हयातून या प्रकल्पास तीव्र विरोध झाला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी जमीनी देण्यास स्पष्ट नकार देत हा महामार्गच रद्द करण्याचा आग्रह धरला. Shaktipeeth highway शक्तिपीठ महामार्ग त्यावेळी सरकारमधील घटक पक्षांकडूनही विरोध झाल्यानंतर सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, करवीर, आजरा, हातकणगले, शिरोळ व कागल तालुक्यातील भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित करीत या प्रकल्पाची नव्याने आखणी करण्याची घोषणा केली होती. सुधारित आखणीनुसार हा महामार्ग दिग्रज ( जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असा निश्चित करण्यात आला असून एकूण लांबी ८५६.७६५ किलोमीटर आहे. राज्य सरकारने आराखड्यातील बदलांना मंजुरी दिली आहे. आता अधिग्रहणासाठी नोटिसा जारी करून संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही धार्मिक स्थळे जोडली जाणार या सुधारित मार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे व धार्मिक स्थळे अत्यंत कमी अंतरात जोडली जाणार आहेत. त्यामध्ये माहूर (रेणुकामाता), औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, परळी वैद्यनाथ, अंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर महालक्ष्मी, पन्हाळा- ज्योतिबा, माहूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी असे इतर अनेक धार्मिक स्थळांनाही सुलभ जोडणी मिळणार आहे. Saktipeeth Highway हेही वाचा: UPI: यूपीआयचा नवा विक्रम! वर्षभरात ३०८ लाख कोटींचे व्यवहार; तर मार्चमध्ये दररोज १ लाख कोटींची उलाढाल