Karnataka Case : देशभरात खळबळ …! सफाई कर्मचाऱ्याने १०० मृतदेह पुरल्याचा न्यायालयात केला दावा, काय आहे कर्नाटकातील चक्रावणारं प्रकरण?

Karnataka Case : कर्नाटकात एका सफाई कर्मचाऱ्याने न्यायालयात दिलेल्या जबाबामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयात सफाई कर्मचाऱ्याने दिलेल्या जबाबामुळे सारेचजण चक्रावून गेले आहेत. या व्यक्तीने 100 मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी दफन केले होते, असा दावा केला आहे. यामुळे सध्या कर्नाटकातील या प्रकरणाची मोठी चर्चा आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय हे पाहूयात…
व्यक्तीच्या मागे वकिलांची फौज
११ जुलै या दिवशी कर्नाटकच्या बेलथांमडी न्यायालयात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात एक व्यक्ती पूर्णपणे काळ्या कपड्यात न्यायालयात आणले जाते. याव्यक्तीच्या मागे वकिलांची मोठी फौज उभी होती. या व्यक्तीला न्यायालयाच्या परिसरात आणल्यानंतर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून….
या व्यक्तीला न्यायालयात हजर केले असता त्याने 1995 ते 2014 दरम्यान बलात्काराच्या पीडित मुली, महिला आणि पुरुषांचे जवळपास 100 मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी दफन केले होते, असा दावा केला आहे. तसेच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी इतके वर्षे गप्प होतो, असंही या कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. सदर व्यक्ती धर्मस्थळस्थित एका प्रसिद्ध धार्मिक संस्थेत काम करत होता.
फोटो अन् पुरावे केले सादर
या व्यक्तीची ओळख उघड करण्यात आली नसून, १९९५ ते २०१४ पर्यंत धर्मस्थळ परिसरात सफाई कर्मचाऱ्याने अनेक क्रूर हत्या केल्यानंतर मृतदेह दफन करण्यास भाग पाडण्यात आले. या पुरलेल्या मृतदेहांमध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि शारीरिक आणि मानसिक छळ झालेल्या अनेक मुली होत्या. सफाई कर्मचाऱ्याने मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवताना यासंदर्भात फोटो आणि पुरावेदेखील दिले आहेत.
यामागे शक्तीशाली लोक
धर्मस्थळ गावाभोवती अनेक ठिकाणी हे मृतदेह पुरण्यात आले होते. याशिवाय काही मृतदेह जाळण्यासाठी डिझेलचा वापरही करण्यात आला होता. या सगळ्यामागे काही ‘शक्तिशाली लोक’ आहेत, असा धक्कादायक दावाही सफाई कर्मचाऱ्याने केला आहे. जर त्याला पुरेशी सुरक्षा दिली तरच तो त्या लोकांची ओळख उघड करू शकेल, असे त्याने त्याच्या जबाबात म्हटले आहे. सदर प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलांच्या एक टीमनं तपासासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
विशेष तपास पथकाची स्थापना
या प्रकरणाची गंभीर दखल कर्नाटक सरकारने घेतली असून २० जुलै रोजी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथही नेमण्यात आली आहे.
हेही वाचा : संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी; उज्वल निकम राहणार उपस्थित





