Pune : पर्यटकांसाठी पीएमपी ठरली लाडाची

पुणे – शहर, जिल्ह्यातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) सुरू केलेल्या पुणे दर्शन, पर्यटन बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या सहा महिन्यांत पर्यटनसेवेतून पीएमपीला २० लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाले. जून महिन्यात सर्वाधिक साडेसहा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक स्थळाबरोबर निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. त्यामुळे राज्यासह परदेशातून पर्यटक गडकिल्ले, सह्याद्री पर्वतरांग, मंदिरे, लेण्या, संग्रहालये पाहण्यासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी पीएमपीने शहरातील स्थळांना भेट देण्यासाठी पुणे दर्शन, तर शहराबाहेरील पर्यटनस्थळांच्या भेटीसाठी पर्यटन बससेवा सुरू केली आहे. त्यात शहराबाहेरील १० पर्यटन बससेवेचा समावेश आहे.
पर्यटन बससेवेतील उत्पन्न : १४ लाख ५४ हजार ५००
पुणे दर्शन बससेवेतील उत्पन्न : ६ लाख २६ हजार
मागील सहा महिन्यांत पुणे दर्शन, पर्यटन बससेवेचा लाभ साडेचार हजार पर्यटकांनी घेतला आहे. त्यातून पीएमपीला २० लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यातही पर्यटन बससेवेला पर्यटकांची अधिक पसंती मिळत आहे. हा प्रतिसाद लक्षात घेऊन पावसाळ्यात लोणावळा, एकवीरा देवी मार्गावर नवीन पर्यटन बससेवा सुरू करत आहे. श्रावण महिन्यातही पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
ग्रुप बुकिंगला सवलत
पुणे दर्शन आणि पर्यटन बससेवेसाठी प्रति व्यक्ती ५०० रुपये तिकिट दर आहे. पर्यटन बससेवेत ३३ प्रवाशांचे ग्रुप बुकिंग केल्यास ५ जणांना मोफत प्रवास आहे. त्यासाठी डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी, निगडी, मनपा भवन पास केंद्रांवरून बुकिंग करता येणार आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटन बससेवा असेल. ग्रुप बुकिंग असल्यास सातही दिवस सेवा मिळणार आहे.






