महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ 5 जिल्ह्यांत अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई : हवामान खात्याने वर्तवलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या अंदाजामुळे ठाणे, पालघर, नवी मुंबई, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांत उद्या, 20 ऑगस्ट रोजी सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत. रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तसेच चिपळूण येथील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्री, लांजातील काजळी आणि राजापूर येथील कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड तालुक्यांतील 1282 प्राथमिक शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्टमुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील नद्या-नाल्यांना महापूर आला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यांत 20 व 21 ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ आणि कोयना-वारणा धरणांच्या विसर्गामुळे पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय तीव्र केले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत आज पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, चाकरमान्यांचे हाल झाले. उद्याही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.





