Maharashtra Politics : राष्ट्रवादीत पवार कुटुंबाची नवी पिढी सक्रिय; सुनेत्रा पवारांनी पार्थ पवारांवर सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्यसमितीची घोषणा करण्यात आली आहे.

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार आणि जय पवार यांचा पक्षाच्या राष्ट्रीय कार्यसमितीत समावेश केला आहे. २९ एप्रिल रोजी सुनेत्रा पवार यांनी भारतीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रानुसार, पार्थ पवार यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
तर त्यांचे धाकटे बंधू जय पवार यांची राष्ट्रीय सचिव आणि पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या पत्रानुसार, पार्थ पवार यांच्यावर पक्षाच्या समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
निवडणूक आयोगाच्या सचिवांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यसमितीतील २२ सदस्यांची यादी सादर केली आहे. अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार यांच्याव्यतिरिक्त या कार्यसमितीत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते), सुनील तटकरे (लोकसभेतील पक्षाचे नेते) आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा समावेश आहे.
इतर प्रमुख सदस्यांमध्ये ज्येष्ठ नेते दिलीप पाटील आणि खजिनदार म्हणून शिवाजीराव गर्जे यांचा समावेश आहे. पार्थ पवार हे सुबोध मोहिते यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम पाहतील. (Maharashtra Politics)
विधानमंडळात मोबाईलवर गेम खेळताना आणि शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधाने करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचाही या कार्यसमितीत समावेश करण्यात आला आहे.
जय पवार यांची राष्ट्रीय सचिव आणि पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यासोबतच त्यांच्याकडे खजिनदारपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
या समितीत धीरज शर्मा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष (युवक आघाडी) म्हणून समावेश आहे. तसेच आमदार चेतन तुपे, शेखर निकम, सना मलिक आणि सरोज अहिरे यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
इतर सदस्यांमध्ये अविनाश आदिक, संजय प्रजापती, अरुणाचल प्रदेशचे आमदार टोको तातुंग, राणा रणवीर सिंह, डॉ. रमन प्रीत सिंह, धनंजय शर्मा आणि डॉ. अभिषेक व्ही. बोके यांचा समावेश असून, या सर्वांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)





