Pune Municipal Corporation: सत्ताधाऱ्यांमध्ये निधीवरून धुसफूस
Pune Municipal Corporation:

पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; ९५ कोटींचे ७२ ब प्रस्ताव वगळले
Pune Municipal Corporation: महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही विकासकामांच्या निधीवरून पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप नगरसेवकांनी एकजूट दाखवत स्वपक्षातील दोन नगरसेवकांच्या सुमारे ९५ कोटी रुपयांच्या विकासकामांना विरोध केला.
७२ ब अंतर्गत नगरसेवकांना निधीची तरतूद करता येत नसल्याची भूमिका घेत या नगरसेवकांनी प्रस्तावांना विरोध केला. अखेर मॉडेल सीबीएसई स्कूल आणि रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेवरून वगळण्यात आले.
मोठे प्रकल्प एका आर्थिक वर्षात पूर्ण होत नसल्याने कामे पूर्ण होईपर्यंत पुढील अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ७२ (ब) चा वापर केला जातो. मात्र, या तरतुदीचा वापर नगरसेवक करू शकतात का, यावरून भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी पर्वती मतदारसंघातील विकासकामांसाठी देण्यात आलेला ३४ कोटींचा ७२ ब अंतर्गत प्रस्ताव प्रशासनाने दप्तरी दाखल केला होता. त्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पर्वतीतील भाजप नगरसेवकांची बैठक घेऊन ७२ ब अंतर्गत नगरसेवकांनी प्रस्ताव देऊ नयेत, अशी भूमिका मांडण्यात आली.
असे प्रस्ताव आल्यास त्यांना विरोध करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अजेंडा बैठकीपासून मुख्य सभेपर्यंत नगरसेवकांनी विरोध कायम ठेवला. प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न झाल्यास सभात्याग करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
हे प्रस्ताव वगळले
प्रभाग क्रमांक ३९ क मध्ये नगरसेविका रुपाली धावडे यांनी प्रस्तावित केलेल्या मॉडेल सीबीएसई स्कूलसाठी ६१.९ कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव कार्यपत्रिकेवरून वगळण्यात आला, तसेच प्रभाग क्रमांक १० मध्ये नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी भूगाव आणि चांदणी चौक परिसरातील रस्त्यांसाठी मागितलेली ३४ कोटींची तरतूदही वगळण्यात आली. खराब फर्निचर आणि कपड्यांच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ७५ टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७४ कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव अनिर्णित राहिला.
केवळ मोठ्या प्रकल्पांसाठी ७२ ब ची तरतूद प्रशासनाकडून केली जाते. नगरसेवकांनी प्रस्ताव दिले तर ते मंजूर केले जाणार नाहीत. त्यामुळे हे प्रस्ताव वगळले आहेत. यासंदर्भात पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
— गणेश बिडकर, सभागृहनेता, भाजप





