Pune Ganesh Visarjan 2026: पुण्यात 27 तास उलटूनही अद्याप मिरवणुका सुरूच; 200 हून अधिक गणपतींचे विसर्जन बाकी
Pune Ganesh Visarjan 2026: यंदाच्या वर्षी गणपती विसर्जन मिरवणूक किती तास चालणार?

Pune Ganesh Visarjan 2026: पुण्यात साधारण २७ तास उलटून गेल्यानंतरही विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष कायम आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावरून अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुका अजूनही सुरूच आहेत. लक्ष्मी रस्त्यावरून पारंपरिक ढोल-ताशा पथके, तर कुमठेकर आणि टिळक रस्त्यावरून डीजे साउंड सिस्टिमच्या तालावर लोक थिरकताना दिसत आहेत.
शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास सुरू झालेल्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला २७ तास उलटून गेले तरी अद्याप २०० हून अधिक गणपतींचे विसर्जन होणे बाकी आहे. सध्या टिळक रोड येथे अजून १०० मंडळ लाइनला आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी पुण्यातील मिरवणूक तब्बल ३३ तास चालली होती. त्याआधीच्या वर्षी मिरवणूक सुमारे २८ तास ४५ मिनिटे चालली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी गणपती विसर्जन मिरवणूक किती तास चालणार हे पाहावे लागेल.
मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन ८ तासांत पूर्ण
दरम्यान, पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन ८ तासांत पार पडले. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालेली ही मिरवणूक सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी संपली. यामध्ये मानाचा पहिला कसबा गणपती दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी
तर दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सायंकाळी ५ वाजता, तिसरा गुरुजी तालीम मंडळ ५ वाजून ५ मिनिटांनी, चौथा तुळशीबाग गणपती ५ वाजून ३५ मिनिटांनी, तर पाचवा केसरीवाडा गणपती सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी विसर्जित झाला. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे अनंत चतुर्दशीला रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावरील हौदात विसर्जन करण्यात आले.
प्रमुख रस्त्यांवरून ३७२ मंडळे रवाना
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरून शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मोठ्या संख्येने गणेश मंडळे पुढे गेली. यामध्ये अलका टॉकीज चौकातून सर्वाधिक ३७२ मंडळे गेल्याची नोंद झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, लक्ष्मी रस्त्यावरून ११२, टिळक रस्त्यावरून १११, केळकर रस्त्यावरून ७८, तर कुमठेकर रस्त्यावरून ७१ मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली. प्रमुख विसर्जन मार्गांवरून मंडळे पुढे जात असल्याने शहरातील मध्यवर्ती भागात मोठी गर्दी झाली.
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांची सुरुवात आणि शेवटचे टोकही निश्चित करण्यात आले होते.
त्यानुसार शिवाजी रस्ता- राष्ट्रभूषण चौक, लक्ष्मी रस्ता- नाना चावडी (नाना पेठ), टिळक रस्ता/सातारा रस्ता- पंचमी हॉटेल चौक, तर केळकर रस्ता- सकाळ प्रेस हे शेवटचे टोक निश्चित करण्यात आले होते.
याआधी २०२५ मध्ये चार प्रमुख विसर्जन मार्गांवर एकूण ६०४ मंडळांना परवानगी होती — लक्ष्मी रस्ता २६६, टिळक रस्ता २३७, केळकर रस्ता ७९, तर कुमठेकर रस्ता २२ मंडळे होती.
हेही वाचा:





