Narayangaon : विसर्जन मिरवणुकीत देखाव्यांनी जिंकली नागरिकांची मने
Narayangaon : वेध मित्र मंडळाने हिंदू धर्माची परंपरा आणि जोपासना अधोरेखित करणारा श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या जन्माचा देखावा सादर केला.

नारायणगाव : नारायणगाव नगरीतील गणेश विसर्जन मिरवणुकीत विविध गणेश मंडळांनी सादर केलेल्या आकर्षक आणि वैविध्यपूर्ण देखाव्यांनी गणेशभक्तांची मने जिंकली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद, विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मिरवणुकीतील शेवटच्या गणपतीचे रात्री दोन वाजता मीना नदीपात्रात विसर्जन करण्यात आले.
सायंकाळी नारायणगाव बसस्थानकापासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशमूर्ती मार्गस्थ झाल्या. तरुण-तरुणींनी ढोल-ताशांच्या तालावर उत्साहात सहभाग घेतला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीला रंगत आली. महासूर्योदय मंडळाने सादर केलेला पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा देखावा विशेष आकर्षण ठरला. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे महत्त्व अधोरेखित करणार्या या देखाव्याला गणेशभक्तांनी मोठी दाद दिली.
वेध मित्र मंडळाने हिंदू धर्माची परंपरा आणि जोपासना अधोरेखित करणारा श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या जन्माचा देखावा सादर केला. श्रीराम मित्र मंडळाने श्रीराम व हनुमानाचा देखावा, तर श्री मुक्ताबाई युवक मंडळाने भगवान विष्णूच्या वराह अवताराचा जिवंत देखावा सादर केला.
प्रणाद मित्र मंडळाने केरळमधील ‘थय्यम’ परंपरेवर आधारित देखावा सादर केला. नवतरुण झुंजार मित्र मंडळाने ऐतिहासिक देखाव्याद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय श्री गणेश शेटे मळा, इंदिरानगरचा राजा, आनंदवाडी मित्र मंडळ, शिवरत्न मित्र मंडळ यांसह अनेक मंडळांनी विविध विषयांवरील आकर्षक देखावे सादर केले. हे देखावे पाहण्यासाठी नारायणगाव परिसरासह बाहेरगावाहून आलेल्या हजारो गणेशभक्तांनी गर्दी केली होती.
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस अधिकारी, 25 पोलीस अंमलदार आणि 25 होमगार्ड यांनी बंदोबस्त व वाहतूक नियोजनाची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. गणेशभक्तांच्या सोयीसाठी नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायतीने विसर्जनस्थळी आवश्यक व्यवस्था केली होती.





