Amruta Fadnavis : गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं? अमृता फडणवीसांचं होतयं कौतुक
Amruta Fadnavis : गणेशोत्सवानंतर जुहू समुद्रकिनाऱ्यावर ‘सी, शोर, शाईन-२०२६’ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत ३४ टन कचरा संकलित करण्यात आला.

Amruta Fadnavis : गणेशोत्सव संपल्यानंतर मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी जुहू समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी पहाटे ‘सी, शोर, शाईन-२०२६’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस, अभिनेता अजय देवगण, शालेय विद्यार्थी आणि विविध संस्थांचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यान समुद्रकिनाऱ्यावरून सुमारे ३४ टन कचरा संकलित करण्यात आला. या उपक्रमाबाबत अमृता फडणवीस यांसह सहभागी सर्वाचे कोतुक होत आहे.
दिव्याज फाउंडेशन, मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि मेघा श्रेय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेल्या निर्माल्यातील फुले वेगळी करून त्यावर प्रक्रिया करण्याचा उपक्रमही राबवण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या फुलांपासून अगरबत्ती तसेच इतर उपयुक्त वस्तू तयार करण्यात येणार आहेत.
उत्सवानंतर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून नागरिकांचीही आहे. समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले. आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे ज्या शहरात आणि देशात आपण राहतो, तेही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे अजय देवगण यांनी सांगितले.
यंदा महानगरपालिकेच्या विविध प्रयत्नांमुळे मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. भविष्यात प्रक्रिया केलेले पाणीच समुद्रात सोडण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे समुद्र अधिक स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असे आमदार अमित साटम यांनी सांगितले. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिव्याज फाउंडेशनच्या सामाजिक आणि स्वच्छता उपक्रमांचे कौतुक केले.
समुद्र ही मुंबईची मोठी संपत्ती आहे. नागरिकांनी समुद्रात किंवा समुद्रकिनाऱ्यावर कचरा आणि प्लास्टिक टाकू नये. उत्सव संपल्यानंतरही स्वच्छतेची सवय कायम ठेवावी आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.
या वेळी आमदार राम कदम, स्थानिक नगरसेविका सीमा सिंग, सह आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले आदी उपस्थित होते.





